महिलांच्या भागीदारीतून विज्ञानाचा आणखी विकास व्हावा – पंतप्रधान मोदी

नागपूर : ३ जानेवारी – भारत आधुनिक विज्ञानाची ऍडव्हान्स प्रयोगशाळा बनावा. महिलांच्या भागीदारीतून विज्ञानाचा आणखी विकास व्हावा. तरुणांना व्यासपीठ प्रदान करणारे इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क तयार व्हावे असे मत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. १०८ व्या भारतीय विज्ञान परिषदेच्या ( इंडियन सायन्स काँग्रेस ) उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती. पंतप्रधान मोदी यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले.
भारतीय शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन जगभरासाठी मार्गदर्शक ठरत आहे. भारताने केलेल्या असाधारण कामांची चर्चा आज जगभरात आहे. भविष्यात भारतीय प्रयोगशाळेतील संशोधन जगाच्या गरजा पूर्ण करणार आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. नागपुरात आयोजित 108 व्या इंडियन सायन्स कॉंग्रेसच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. या सोहळ्यात पंतप्रधान व्हर्च्युअली सहभागी झाले होते.
व्यासपीठावर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे शताब्दी सोहळ्याच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष नितीन गडकरी यांचा समावेश आहे. तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञानमंत्री, डॉ जितेंद्र सिंह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी आणि इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन ISCA (आयएससीए), कोलकाताच्या सरचिटणीस डॉ. विजय लक्ष्मी सक्सेना यांची उपस्थिती होती.
मान्यवरांना मार्गदर्शन करताना पंतप्रधान म्हणाले, ‘पुढील 25 वर्षात भारत ज्या उंचीवर पोहोचणार आहेत. त्यात देशाच्या वैज्ञानिक शक्तीची भूमिका महत्वाची असणार आहे. संशोधन क्षेत्रात आवडीसह त्याला देशसेवेच्या संकल्पाची जोड दिल्यास अभूतपूर्व निकाल येईल. सध्या डेटा एनालिसिस क्षेत्राचा झपाट्याने विकास होत आहे. भारताकडे डेटा आणि तंत्रज्ञान दोन्हीचा विकास होत आहे. त्याद्वारे येत्या काही वर्षात देश एका नव्या उंचीवर पोहचणार असल्याचा विश्वासही यावेळी पंतप्रधानांनी व्यक्त केला.’
पंतप्रधान म्हणाले, ‘पीएचडी मिळवणाऱ्या संशोधकांमध्ये जगात टॉप तीनमध्ये आहे. तसेच स्टार्टअप मध्येही टॉप तीनमध्ये आहे. विज्ञानाच्या क्षेत्रातही देशाची गती झपाट्याने वाढली आहे. जगभरातील 130 देशांच्या यादीत 2015मध्ये 81 व्या क्रमांकावरुन आपल्या देशाने 2022मध्ये 40 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. शास्त्रज्ञांनी तरुणांना संशोधनासाठी प्रोत्साहीत करावे. त्यांच्यातील संशोधकाला व्यासपीठ मिळाला तर येत्या काही वर्षात देश जगाचे मार्गदर्शन करणार आहे, असा विश्वासही यावेळी पंतप्रधानांनी व्यक्त केला.
‘आज महिला सर्व क्षेत्रात अग्रणी आहेत. विज्ञानाच्या मदतीने महिलांचे सक्षमीकरण करण्यापेक्षा महिलांच्या भागिदारीने विज्ञानाचे सक्षमीकरण करण्याकडे आपण वाटचाल करु’, असेही पंतप्रधान म्हणाले. जी 20च्या अध्यक्षपदाबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले, जी 20च्या प्रमुख विषयांमध्येही महिलांच्या विकासाच्या मुद्द्यावर प्राथमिकता देण्यात आली आहे. गेल्या आठ वर्षात देशाने गवर्नेंससह अनेक असाधारण कार्य केले आहे. त्याची चर्चा जगभरात चर्चा असल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केले.

Leave a Reply