विधानसभेत मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर तुफान टोलेबाजी

नागपूर : ३० डिसेंबर – अडीच वर्ष बाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा अन् बक्षीस मिळवा, म्हणून आम्ही मुख्यमंत्रीच बदलून टाकला, अशा शब्दात उद्धव ठाकरेंना टोला लगावत अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फुल्ल बॅटिंग केली. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, अडीच वर्षात तुम्ही विदर्भासाठी कोणता निर्णय घेतला. विदर्भातील शेतकरी चांगल्या गाडीतून फिरला पाहिजे. विमानातून शेतकरी फिरला पाहिजे. तालुक्यांत विमानतळ सुरु करतोय. मुख्यमंत्री कसा हेलिकॉप्टरने शेतावर जातो म्हणून हिणवलं. दुसरा मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने जाणारा दाखवा आणि बक्षिस मिळवा असं म्हटले. मी तर म्हणतो मागचे मुख्यमंत्री कधी घराबाहेर पडले हे दाखवा आणि बक्षिस मिळवा, असं ते म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले की, अजित दादांकडून कालचे निर्णय झाले त्याचे स्वागत होईल असं वाटलं होतं. पण तुम्ही आमच्या भाषणावर किती टाळ्या झाल्या हे मोजत होते. दादांना वाटलं नव्हतं की एवढे मोठे आम्ही निर्णय घेऊ, आमच्या सरकारच्या कामाचा हा वेग त्यांनी पाहिला आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
मुख्यमंत्री म्हणाले की, मी पंतप्रधान मोदी यांच्याशी बोललो. ते म्हणाले की असे उद्योग जात नसतात. त्यांना काय माहीत की सरकार बदलणार आहे. बाकीचे इंटरेस्ट ठेवलं तर कोण येणार इथे, असा टोला त्यांनी लगावला. ते म्हणाले की, आम्ही 70 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प मंजूर केले. त्यापैकी 40 हजार कोटींचे प्रकल्प विदर्भात आहेत, असंही ते म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले की, अडीच वर्षांत एका प्रकल्पाला मान्यता दिली आम्ही 18 प्रकल्पांना मान्यता दिली. चुका सुधारल्यानंतर माणूस सुधारतो. आम्ही वर्षावर नंतर गेलो तर तिकडे ‘वर्षा’वर पाटीभर लिंब सापडली. प्रबोधनकार ठाकरेंचे नातू लिंबू टिंबूची भाषा करु लागले. रेशीम बागेत गेल्यानंतर अनेकांनी आम्हाला हिणवलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं काम करायचं म्हणून आम्ही रेशीम बागेत गेलो, गोविंदबागेत गेलो नाही, असंही ते म्हणाले.
अजित पवारांनी काही वर्षांपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार असताना धरणातील पाण्याच्या मुद्द्यावरून आक्षेपार्ह विधान केलं होतं. एका जाहीर सभेत शेतकऱ्यांनी पाण्याच्या तुटवड्याचा मुद्दा उपस्थित केला असता अजित पवारांनी त्यावरून त्यांच्या शैलीत “धरणात पाणी नाही तर तिथे मी काय ***?” असा जाहीर सवालच केला होता. त्यावरून बराच वाद झाल्यानंतर अखेर अजित पवारांनी एक दिवसाचं उपोषण करत आत्मक्लेश केला होता.
दरम्यान, बऱ्याच वर्षांनंतर पुन्हा एकदा अजित पवारांचं हे विधान थेट विधानसभेत चर्चेला आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना अजित पवारांना त्यांच्या त्या विधानाची आठवण करून दिली.”अजितदादा, तुम्ही काल बोलले, की मी आता चुकत नाही. मी आता काळजी घेतो. पण जेव्हा शेतकऱ्यांनी पाणी मागितलं तेव्हा आपल्या तोंडून काहीतरी निघून गेलं. तेव्हा तुम्हाला आत्मक्लेश करायला कुठे जावं लागलं?” असा खोचक सवाल एकनाथ शिंदेंनी केला.
जयंत पाटील आज सभागृहात नाहीत पण ते बोलले ना राष्ट्रवादीची शिवसेना. होय ते बरोबर बोलले राष्ट्रवादीची शिवसेना असल्यानेच आम्ही मोठा निर्णय घेतला असं म्हणत उद्धव ठाकरेंवर टीका केली. आता सांगत आहेत फेब्रुवारीत सरकार पडणार. जसं काय जज यांना रोज फोन करून सांगतात की मी असा निकाल देणार आहे. माझा स्वभाव टीका करण्याचा नाही म्हणून मी शांत आहे पण त्याला माझी कमजोरी समजू नका. बात निकलेगी तो बहुत दूर तलक जाएगी असाही टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.

Leave a Reply