वाशिममधील गायरान जमिनीबाबत कसा काय निर्णय घेतला – जितेंद्र आव्हाड

नागपूर : २९ डिसेंबर – वाशिममधील गायरान जमिनीचा वाद आता टोकाला पोहचला आहे. त्यामुळे विरोधकांनीही यावर जोरदार आवाज उठवत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना राजीनामा द्यावाच लागेल अशी ठाम भूमिका घेतली आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून त्यामध्ये 80 कोटीची जमीन फक्त 2 कोटीला कशी काय देऊ शकता असा सवाल विरोधकांनी केला आहे. जून 2011 मध्ये उच्च न्यायालयाने गायरान जमिनींविषयी निर्णय देताना सांगितले होते की, आता गायरान जमिनी कोणालाही देता येणार नाहीत.
त्यानंतर ऑगस्ट 2011 मध्ये उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार महाराष्ट्र सरकारनेही अध्यादेश काढून गायरान जमिनी कोणालाच देता येणार नाहीत हा निर्णय कायम ठेवला होता.
हा निर्णय मुख्यमंत्री, मंत्री यांना माहिती असूनही कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी वाशिममधील गायरान जमिनीबाबत कसा काय निर्णय घेतला असा सवाल आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी या उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा संदर्भ देत अब्दुल सत्तार हे नैतिकतेच्या अधिष्ठानावर चुकलेले आहेत. त्यामुळे त्यांना आता राजीनामा दिल्याशिवाय पर्यायच राहणार नाही असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला आहे.
गायरान जमिनींच्या निर्णयाबाबत माहिती देताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, गायरान जमिनीबाबत उच्च न्यायालयाने 2011 मध्ये एक निर्णय दिला होता की, गायरान जमिनी कोणालाही देता येणार नाहीत. त्यामुळे त्या निर्णयाला अनुसरून महाराष्ट्र सरकारने ऑगस्ट 2011 मध्ये अध्यादेश काढला.
तर जून 2022 मध्येही न्यायालयाने पुन्हा 2011 चा निर्णय योग्य असल्याचे सांगत त्याच निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. तरीही अब्दुल सत्तार यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून गायरान जमिनीविषयी निर्णय घेतला असल्याची टीका त्यांच्यावर करण्यात आली आहे.
गायरान जमिनीबाबत उच्च न्यायालयाचा कडक निर्णय असतानाही मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून वाशिमधील गायरान जमीन देण्यात आल्यानंतर त्यावर उच्च न्यायालयाने ताशेरे मारले आहेत.
तर जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकाऱ्यांनीही हा निर्णय चुकीचा असल्याचे कळवले आहे तरीही त्याविरोधात जाऊन तुम्ही ती जमीन दिलेली आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
त्यामुळे तुमच्या या निर्णयाविरोधात उच्च न्यायायाने तुम्हाला तुमच्या चुका दाखवून दिल्या आहेत. त्यामुळे आता तुम्हाला राजीनामा दिल्याशिवाय पर्यायच राहिला नाही असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे.
तसेच ज्या जमिनीवर मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आहे त्या निर्णयाविरोधात जो सूर्यवंशी नावाचा अधिकारी जमीन देऊ नका असं सांगत होता. असेही त्यांनी सांगितले आहे.

Leave a Reply