कबर – विजय लिमये

इतिहासातील दोन पुरुषांनी मला आयुष्याचा फार मोठा धडा शिकवला आहे. पहिला अलेक्झांडर आणि दुसरा औरंगजेब.

गोष्ट अशी आहे की अलेक्झांडर जग जिंकण्याच्या इराद्याने देश सोडून निघाला आणि अर्धेही जग पादक्रांत न करता, इहलोक सोडून गेला. आपल्या राजाच्या महत्त्वकांक्षेपाई सैन्याची ससेहोलपट होत राहिली, आणि सततच्या लढाया, अखंड प्रवास, जेवणाची आबाळ याने सैन्य कंटाळले. यात कुणाचाच फायदा झाला नाही, अखेर अलेक्झांडरने पुन्हा मायदेशी परतण्याचा मार्ग पत्करला पण त्याच्या हातातून वेळ निघून गेली होती. परतीच्या मार्गावरच त्याचा अंत झाला, आपल्या शेवटच्या इच्छेत त्याने सांगितले होते; मला जेव्हा जमिनीत गाडाल तेव्हा माझे हात थडग्याच्या बाहेर ठेवा! जेणेकरून सर्वांना समजेल या राजाने सर्व काही मिळवण्याच्या नादात सगळे गमावले, म्हणून मोकळ्या हातानेच इहलोक सोडला.

औरंगजेब असाच अत्यंत महत्त्वाकांक्षी, विविध प्रांत जिंकण्याच्या इराद्याने अगदी वयाच्या ६२व्या वर्षी रणांगणात उतरला. वास्तविक जगातील सर्व सुखे त्याच्या पायाशी लोळण घेत होती, त्याला म्हणावे तर कशाचीच कमी नव्हती. त्या काळात तो जगातील सर्वात श्रीमंत बादशहा होता, असे असतानाही लोभ, अहंकार, धर्मवेड आणि साम्राज्य विस्तार, तोही संहार करून मिळवणे, यात स्वतःचा नायनाट झाला तरी चालेल हे धोरण ठेवून त्याने दिल्ली सोडली. दक्षिणेकडे सतत प्रवास, वाटेत लढाया, सैन्याची आबाळ, त्याचे फलित असे झाले, वृद्धापकाळात सुद्धा त्याला मनःशांती लाभली नाही आणि लोकांचा विनाश करण्याच्या नादात स्वतःचाच विनाश झाला.

हे फार थोड्या लोकांना माहिती आहे, मुघलांची सर्व संपत्ती दख्खनच्या लढाया करताना संपली आणि औरंग्या शेवटी कर्जबाजारी होऊन मेला. असे सांगतात, शेवटी त्याच्याकडे फक्त रू तीनशे उरले होते, ते दान करावे असे त्याने मरताना सांगितले. महाराष्ट्राच्या मातीत त्याला गाडण्यात आले; अहमदनगर मध्ये त्याचा अतृप्त मृत्यू झाला आणि औरंगाबाद नजदीक खुलताबाद येथे त्याचे साधे थडगे ठाकले गेले.

मरताना तो मुलाला म्हणाला…

मी एकटा आलो! …… आणि मी अनोळखी म्हणून जात आहे!

मी कोण आहे हे मला कळेना! …… आणि मी काय करत होतो हे मला आजपर्यत समजलेच नाही!

“I came alone and I go as a stranger. I do not know who I am, nor what I have been doing,”

दोघांनी इतिहासासाठी काय ठेवले? येणाऱ्या पिढ्यांच्यासाठी विकृत मनोवृत्ती असलेले बादशाह होऊन गेले, असाच उल्लेख राहिला. जी साधन संपत्ती पूर्वजांच्याकडून प्राप्त झाली होती, ती सर्व नष्ट झाली. पहिला जग जिंकण्याच्या नादात संपला, दुसरा दक्षिण आशिया काबीज करण्याच्या महत्वाकांक्षेने मेला. माणुसकी संपली, म्हणून त्यांचा इतिहास काळ्या अक्षरात लिहिला गेला. अघोरी संपत्ती वाढविण्याच्या नादात सर्व गमावून बसले.

हे लिहिताना लहानपणी वाचनात आलेली कथा आठवली, अर्थात ती सर्वांना माहिती आहेच, तरीही थोडक्यात सांगतो…

एक राजा आपल्या राज्यात दवंडी पिटवतो, जो कोणी सूर्योदयापासून पाळायला सुरुवात करून, त्याच जागेवर सूर्यास्त होण्याआधी परतेल, त्याला तो जितका पळाला तितकी जमीन बक्षीस देण्यात येईल.

एक इसम हे करण्यास तयार होतो. नियमानुसार तो सूर्योदयापासून पळण्यास सुरुवात करतो, पण हव्यासापोटी सूर्य डोक्यावर आला तरीही पुढेच जात राहतो. जेव्हा सूर्य पश्चिमेला कलतोय हे जाणवते, तोवर वेळ निघून जाते. परतीच्या प्रवासात अतिश्रम सहन न झाल्याने आणि आपण सूर्यास्तापर्यंत परत पोहचू शकणार नाही या जाणिवेने तो खचतो आणि तिथेच गतप्राण होतो. पुढे जाताना कुठे थांबायचे, व परतीचा प्रवास कधी सुरू करायचा हे ज्याला उमगते, त्याचा शेवट गोड होतो.

शेवटी काय तर; त्याला जमिनीत पुरतात, तितकीच जमीन त्याच्या वाट्याची राहते.

औरंगजेबाची कबर पाहताना; कुठेतरी, राजाच्या भूमिकेत अल्लाह भासला आणि इसम म्हणजे औरंगजेब दिसला.

विजय लिमये
9326040204

Leave a Reply