पंढरपूरच्या लक्षवेधीसाठी डॉ.नीलम गोऱ्हे यांचा पुढाकार…

नागपूर : २७ डिसेंबर – पंढरपूरच्या संदर्भातील महत्त्वाच्या लक्षवेधी सूचनेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधक असा झालेला गोंधळ नीटपणे सावरून मूळ विषयावर लक्षवेधी परत आणून सभागृहाचे काम सुरू करण्यात उपसभापती डॉ. नीलम गोरे यांनी आज मोलाची आणि महत्त्वाची भूमिका बाजावली.
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पंढरपूरच्या संदर्भात लक्षवेधीला अनुसरून प्रश्न उपस्थित करत असताना सुब्रह्मण्यम स्वामी यांनी पंतप्रधानांबाबत उच्चारलेले आक्षेपार्ह ट्विट चा उल्लेख करण्याचा प्रयत्न सभागृहात केला. यावरून सत्ताधाऱ्यांनी मिटकरींच्या माफी नाम्याची मागणी केली. सभागृहात यावरून गदारोळ झाला आणि सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.
त्यानंतर सभागृहाच्या कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात निवेदन करून मिटकरींना समज दिली. त्यासोबतच उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मिटकरींना सांगितले की, तुमच्या चुकीमुळे आणि तुम्ही केलेल्या संबंधित उच्चारामुळे या सभागृहाच्या कामकाजाचा वेळ वाया गेला आणि एका चांगल्या आणि महत्त्वपूर्ण विषयावरील लक्षवेधीवर अन्याय होतो आहे, त्यामुळे हा विषय अधिक चिडून न चिघळवता संबंधित विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूनी व्हावा अशी सूचना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. उपसभापतींच्या या निर्देशानंतर मिटकरी यांनी त्यांच्याद्वारे उल्लेखित संबंधित आक्षेपार्ह ट्विट बद्दल सभागृहात दिलगिरी व्यक्त केली. तसेच उपसभापतींनी या संदर्भात मिटकरींनी उच्चारलेले ट्विट आणि त्या उल्लेखाने आलेले आक्षेपार्ह शब्द सभागृहाच्या कामकाजातून वगळून टाकले.
लक्षवेधी सूचना मांडत असताना मिटकरींनी तारतम्य ठेवले असते तर बरे झाले असते. आमदारांच्या वादामध्ये लक्षवेधी सूचना घालवू नका अशा शब्दात उपसभापतींनी सांगितले.
त्यानंतर पंढरपूराच्या संदर्भातील सदर लक्षवेधी वर मिटकरी यांनी आपले प्रश्न उपस्थित केले आणि शासनाच्या वतीने व्यवस्थितपणे त्याचे निराकरण करण्यात आले.
एका भरकटत जाणाऱ्या विषयाला पूर्ववत आणून सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे चालवण्यात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज मोलाचे योगदान दिले.

Leave a Reply