सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येत नाही तोपर्यंत सीमाभाग केंद्रशासित प्रदेश करावा – उद्धव ठाकरे

नागपूर : २६ डिसेंबर – हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सिमा वादावरून वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सीमावादावर विधान परिषदेत आपली भूमिका मांडली. तसेच सीमावाद या महत्वाच्या विषयावर विधानसभेत चर्चा होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिदेंना दिल्लीत जाण्याची गरज काय होती? असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला.
उद्धव ठाकरे म्हणाले, ” कारवार, निपाणी, बेळगावला मी कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र असे म्हणेल आणि जोपर्यंत सीमावादाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येत नाही. तोपर्यंत सीमाभाग केंद्रशासित प्रदेश करावा. असाच ठराव आपण दोन्ही सभागृहात मंजूर करुन तो केंद्र सरकारला पाठवावा. तसेच, सीमाभागातील ज्या ग्रामपंचायतींनी कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला आहे, त्या ग्रामपंचायतींना राज्य सरकार बरखास्त करणार का?”

आज उद्धव ठाकरे संजय राऊत, अंबादास दानवे यांच्यासह विधानभवनात दाखल झाले. यावेळी सीमावादावर आपली भूमिका मांडताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. उद्धव ठाकरे म्हणाले, ” आज मुख्यमंत्री सांगतायत की सीमावादावरून आम्ही लाठ्या खाल्ल्या आहेत. तुम्ही काय आम्हाला सांगता? मात्र, आजही सीमावादावरून लाठ्याच खायच्या का?, असा सवाल त्यांना आहे. आज विधिमंडळात सीमावादाचा महत्त्वाचा मुद्दा मांडला जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिदेंना दिल्लीत जाण्याची गरज काय होती?”

दरम्यान, शिंदे गटाच्या आमदारांनी आजही आदित्य ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर शिंदे गटाने आदित्य ठाकरेंविरोधात आंदोलन केले. विशेष म्हणजे कालच ठाकरे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आपल्या बदनामीच्या पाठीमागे आदित्य ठाकरे असल्याचा गंभीर आरोप केला होता.

Leave a Reply