उधारी – विजय लिमये

मला माहिती आहे आपण प्रत्येकजण सद्दविवेक बुद्धी जागृत ठेवून या लेखाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. साधारणतः आपण आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या तऱ्हेने फसवले जात असतो, त्यात जर का कमी पैशात फसवले गेलो, तर त्याचे वाईट वाटत नाही किंवा फार कमी वेळापुरते वाईट वाटते, परंतु अनेक वेळा आपण मोठ्या रक्कम गमावतो त्याचा मनस्ताप मात्र आपल्याला खूप काळापुरता सलत राहतो.

सकाळी मला अचानक एक अल्प परिचित व्यक्तीचा फोन आला, मिनिट, दीड-मिनिट इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर, त्या माणसाने अचानक पंचावन्न हजारांची अत्यंत गरज आहे आणि आठ दिवसात पैसे देतो अशी मागणी केली. मी त्याला खोलात जाऊन त्याबाबत माहिती मागितली पण तो टाळाटाळ करू लागला. मनात मी जे समजायचं ते समजलो आणि माझी पण आता आर्थिक स्थिती फार चांगली नाही असे सांगून वेळ मारून दिली.

पुढे पंधरा दिवसानंतर त्याचा अचानक पुन्हा एकदा कॉल आला, आता त्याने केवळ तीन हजार रुपये हवे आहेत अशी मागणी केली. माझे काम थोडक्यात अडकले आहे आणि फक्त तीन हजाराची गरज आहे, मी ते चार दिवसात परत करीन वगैरे सांगत शपथ घेऊ लागला. मला नक्की खात्री होती, हा माणूस माझे तीन हजार रुपये कधीही देणार नाही, त्यामुळे मी पुन्हा त्याला पैसे देऊ शकत नाही असे सांगून फोन बंद केला. तात्पर्य : पैसे कुणाकडे मागावे याचं तारतम्य प्रत्येकाला असायला हवे. जर तुमच्या जवळची कोणतीही व्यक्ती तुम्हाला आर्थिक मदत करण्यास समोर येत नाही, हे समजले की तुम्ही दूरच्या लोकांच्याकडे पैसे मागण्यासाठी जाता. वास्तविक जवळच्या लोकांना तुमचा अत्यंत वाईट अनुभव आलेला असल्याने, ते तुम्हाला अजिबात मदत करण्यासाठी पुढे येत नाहीत, यावरूनच तुमची समाजातील पत समजायला हवी, परंतू तसे न होता तुम्ही बुडत्याचा पाय खोलात या उक्तीप्रमाणे, उधारी करत, खोलवर जात राहता.

मुळात या उधारीत राहणाऱ्या, कर्जबाजारी लोकंच्याकडे पैशाचे नियोजन नसणे हेच एकमेव कारण असते. यांचे कमावलेले पैसे ज्या मार्गाने जातात त्यात प्रमुख, सट्टा, जुगार, व्यसन, चैन, व दिखावा करण्यासाठी घेतलेले डोईजड कर्ज.

कोणीही अगदी आपला मुलगा/मुलगी जरी पैसे मागत असल्यास, तितक्याच हक्काने तो ते घेतलेले पैसे कुठे वापरणार आहे याची शहानिशा करा. वेळप्रसंगी जिथे पैसे द्यायचे असतील त्या ठिकाणी स्वतः जावून खात्री करून घ्या, की पैसे योग्य कार्यासाठी खर्च होत आहेत.

ही गोष्ट फक्त पैशाची नसून, इतर अनेक ठिकाणी लागू होते. अनेक वेळा आपल्याकडून वस्तू मागून नेली जाते, जी काळाच्या ओघात आपण विसरतो. घेऊन जाणारी व्यक्ती मात्र ती वस्तू काम झाल्यावर परत आणून देत नाही. क्वचित प्रसंगी त्यांच्या हातून आणलेली वस्तू खराब होते, मोडते, अश्या वेळेस जाणूनबुजून नवीन वस्तू द्यावी लागेल या हेतूने टाळाटाळ केली जाते. या वृत्तीच्या व्यक्ती आपल्या आसपास हमखास असतात, त्यांना दूर ठेवणे तसे कठीण असते, पण ते सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असते.

बहुतांशी वेळेस उधार मागणाऱ्या व्यक्ती तुमचे विनाकारण भरभरून कौतुक करतात, तुमच्या कष्टाला, स्वभावाला अलांकारित भाषा वापरून फुगवून सांगितले जाते, थोडक्यात याला भाटगिरी म्हणा आणि असे एक दोनदा करून मग मुद्यावर येतात. काही वेळेस या व्यक्ती अतिशय विनयशील वर्तणूक दाखवतात. आपल्याला गरज नसताना सुद्धा जाणूनबुजून मदत करायला येतात.
काही महाभाग सलगी वाढविण्यासाठी तुमच्याकडे खाद्य पदार्थ भेट म्हणून आणतील, क्वचित प्रसंगी भेटवस्तू पण आणतात.

थोडक्यात काय

।। अति विनयम धूर्त लक्षणम ।।

विजय लिमये

Leave a Reply