संपादकीय संवाद – रुपालीताई हा नसता उठारेठा कशासाठी?

ज्याने देशासाठी योगदान आणि बलिदान दिले अशीच व्यक्ती राष्ट्रपिता म्हटली जाऊ शकते अशी व्याख्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या रुपाली ठोंबरे यांनी केली आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांनी नरेंद्र मोदी यांना दुसरे राष्ट्रपिता म्हणून गौरविले त्या संदर्भात आता रुपाली ठोंबरे यांनीही टीका केली आहे.
आमच्या या स्तंभातून आम्ही आधीच नमूद केले आहे, की राष्ट्रपिता या पदवीसाठी देशात कोणतीही निश्चित व्याख्या नाही, जनतेला मनापासून वाटले तेव्हा जनतेने अश्या नेत्यांचा केलेला हा गौरव आहे. आमच्या माहितीनुसार महात्मा गांधींनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात जे योगदान दिले त्यामुळे त्यांच्या हयातीतच देशातील जनतेने त्यांना राष्ट्रपिता म्हणून गौरविले होते. त्यांचे देशासाठी बलिदान हे त्यानंतर झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१४ पासून देशाच्या एकूणच जडणघडणीत अमूल्य असे योगदान दिले आहे. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची एक वेगळी प्रतिमा उभी केली आहे. यासाठी संसाराचा त्याग करून त्यांनी देशकार्यात स्वतःला झोकून दिले, हे त्यांचे योगदान तर आहे पण बलिदानही
म्हणता येईल. मग अमृताजींनी त्यांना राष्ट्रपिता म्हटले तर रुपाली ठोंबरेंना इतके वाईट का वाटावे?
छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वार्थाने जाणता राजा म्हणून ओळखले गेले होते, त्यांना ही पदवी समर्थ रामदास स्वामींनी दिल्याचे इतिहास सांगतो आता रुपाली ठोंबरेंचे नेते शरद पवार यांनाही त्यांच्या काही हितचिंतकांनी जाणता राजा म्हणून गौरवण्यास सुरुवात केली आता आक्षेप घेणारे इथेही आक्षेप घेऊ शकतात. छत्रपती शिवाजी महाराज आणि शरद पवार यांची तुलना कुठेतरी होऊ शकेल काय? तरीही जाणता राजा म्हंटले जातेच ना.
आपल्या आदर्शाला कोणत्या पदवीने गौरवावे हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे, अर्थात त्या पदवीसाठी कोणताही कायदा नसावा उद्या एखाद्याने स्वतःला पदमश्री म्हणून घोषित करून घेतले तर ते गैर ठरेल. मात्र कुणी कुणाला अश्या सर्वमान्य पदवीने गौरवले तर ते आक्षेपार्ह का ठरावे? म्हणूनच म्हणतो रुपालीताई हा नसता उठारेठा कशासाठी?

अविनाश पाठक

Leave a Reply