संपादकीय संवाद – इंडिया हे नाव हटवून भारत हे नाव जागतिक स्तरावर प्रतिष्ठित करण्यासाठी डॉ. सुब्रमण्यम स्वामींनी पुढाकार घ्यावा

भारताची राजधानी असलेल्या दिल्लीचे नाव बदलून इंद्रप्रस्थ हे नाव दिले जावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राजकीय विचारवंत डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी केली असल्याचे आज वृत्तपत्रात प्रकाशीत झाले आहे. या मागणीच्या पुष्ट्यर्थ त्यांनी द्रौपदी ट्रस्टच्या डॉ. नीरा मिस्त्रा यांच्या संशोधनाचा आधार घेतला आहे. मोगल साम्राज्यातील दस्तावेज आणि ब्रिटिशांनी काढलेल्या अधिसूचनांमध्येही दिल्लीचा इंद्रप्रस्थ असाच उल्लेख केला असल्याचे डॉ. स्वामी यांनी नमूद केले आहे.
डॉ. स्वामी यांची ही सूचना निश्चितच स्वागतार्ह आहे. आपल्या देशावर साधारणतः सहाव्या शतकापासून मुस्लिमांची आक्रमणे सुरु झाली त्यानंतर बाराव्या शतकापासून ख्रिस्ती धर्मप्रचारक आणि व्यावसायिक आपल्या देशात दाखल झाले. दीर्घकाळ देशावर आधी मुस्लिमांचे आणि नंतर ब्रिटिशांचे सत्ता राहिली. या काळात या सत्ताधीशांनी आपल्क्य देशातील अनेक स्थळांची आणि शहरांची नावे बदलली त्यांनी काही नवी शहरे देखील स्थापित केली आणि त्यांना आपल्या सोयीची नावे दिली. इतकेच काय तर या देशाचे नाव जे आधी हिंदुस्थान किंवा भारत असे होते ते नावही बदलून त्यांनी इंडिया हे नाव दिले.
देशाला स्वातंत्र्य मिळून आज ७४ वर्ष होत आहेत मात्र, आपल्या राज्यकर्त्यांनी परकीय सत्ताधीशांनी दिलेली नावे जपण्यातच धन्यता मानली. खरे तर गेल्या ७४ वर्षात सर्व जुनी नावे बदलून भारतीय जीवनपद्धतीशी सुसंगत अशी नावे बदलणे किंवा मग जी प्राचीन नावे होती ती दिली जाणे आणि प्रतिष्ठित केली जाणे गरजेचे होते. गत ७४ वर्षात भारत हे नाव जागतिक स्तरावर प्रतिष्ठित केले जाणे गरजेचे होते. मात्र आपल्या सत्ताधीशांनी मुस्लिम आणि ख्रिस्ती बांधवांचे लांगुलचालन करण्यातच धन्यता मानली.
नाही म्हणायला काही ठिकाणी जनमताच्या रेट्यामुळे का होईना काही नावे बदलली गेली. इंग्रजांनी ठेवलेले मद्रास हे नाव बदलून मद्रास राज्याचे नाव तामिळनाडू तर मद्रास शहराचे नाव चेन्नई असे बदलले गेले. मुंबाई देवीचे गाव म्हणून महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहराचे नाव इंग्रजांनी आपल्या सोयीसाठी बॉम्बे असे ठेवले होते . ते नावही बदलून पुन्हा मुंबई हे नाव प्रतिष्ठित केले गेले. आधीच्या धाराशिवचे नाव मुस्लिमांनी उस्मानाबाद असे केले होते. तिथेही धाराशिव हे नाव प्रतिष्ठित केले गेले आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची प्रक्रियाही सुरु केली आहे.
अनेक रस्त्यांना आणि चौकांनाही दिलेली परकीय नावे आता बदलली जात आहे. दिल्लीतल्या कर्झन रोडला आता कस्तुरबा गांधी मार्ग ही नवी ओळख मिळाली आहे. तर रेसकोर्स रोडचे नाव लोककल्याण मार्ग असे बदलले गेले आहे. मुंबईच्या व्हिक्टोरिया टर्मिनस या नावाने ओळखल्या गेलेल्या प्रमुख रेल्वे स्थानकाचे नाव छत्रपती शिवाजी टर्मिनस असे बदलले गेले आहे. इतरही काही रेल्वे स्थानकांची नावे बदलून भारतीय नवे देण्याची प्रक्रिया सुरु आहे.
मात्र ही प्रक्रिया अतिशय संथ आहे. असे दुर्दैवाने म्हणावे लागते. सर्वच गावांचे, शहरांचे रस्त्यांचे आणि प्रतिकांचे जुने इतिहास तपासून सुसंगत नावे बदलली जायला हवी. होती मात्र आपल्या देशात अयोध्येत राममंदिर होते किंवा नाही हे ठरवण्यासाठीच सुमारे पन्नास वर्षांहून अधिक काळ न्यायालयीन लढाई लढावी लागली. त्यासाठी रस्त्यावर येऊनही संघर्ष करावा लागला. आता उर्वरित नावे बदलण्यासाठीही संघर्ष करावा लागणार आहे.
कौरव आणि पांडवांच्या संघर्षात ज्यावेळी पांडव हे हस्तिनापूरच्या साम्राज्यातून वेगळे होऊन त्यांनी नवे राज्य निर्माण केले त्यावेळी धर्मराजाने इंद्रप्रस्थ ही नवी राजधानी उभारली होती. हे इंद्रप्रस्थ शहर म्हणजेच आजची दिल्ली असा दावा इतिहास संशोधकांकडून केला जातो. मोगल सम्राटांनी आग्र्याहून आपला कारभार तत्कालीन इंद्रप्रस्थ शहरात हलवला आणि या शहराला दिल्ली हे नाव दिले गेले असा दावा अभ्यासक करतात. या दाव्याची सत्त्यासत्यतात पालटाळून दिल्लीला इंद्रप्रस्थ हे नाव दिले जाणे यात काहीही वावगे होणार नाही खरे तर प्रत्येक राष्ट्रभक्त भारतीयाने ही मागणी उचलून धरायला हवी.
त्याचबरोबर आता मुस्लिम आणि ख्रिस्ती साम्राज्यवादाच्या खुणा जपणारी सर्वच नावे बदलून तिथे प्राचीन नावे किंवा भारतीय संस्कृतीची जपणूक करणारी नावे प्रतिष्ठित केली जायला हवी.
त्याचबरोबर या देशाचे नाव इंग्रजांनी आपल्या सोयीसाठी इंडिया ठेऊन तेच नाव जगभर प्रतिष्ठित केले हा सर्व प्रदेश हिंदूंचा म्हणून ओळखला जात होता म्ह्णाणून याचे नाव हिंदुस्थान असे पडले. तर पुराणकालीन राजा भरताचा प्रदेश म्हणून या देशाला भारत हे नावही दिले गेले होते. आपण सर्वांनीच इंडिया हे नाव हटवून भारत हे नाव प्रतिष्टीत करायला हवे त्यासाठी आपण संघर्ष करून सरकारवर दबाव आणणे हे गरजेचे आहे. सुब्रमण्यम स्वामींसारख्या विचारवंताने या मुद्द्यावर निश्चित पुढाकार घ्यावा देशातील जनता त्यांना निश्चित समर्थन देईल.

अविनाश पाठक

Leave a Reply