गोंदियातील जिल्हा परिषद शाळेत मद्यधुंद शिक्षक वर्गखोलीतच लोळले

गोंदिया : २३ डिसेंबर – गोंदिया जिल्ह्यात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्याअंतर्गत निंबा जिल्हा परिषद शाळेत सकाळी १० वाजेच्या सुमारास एक शिक्षक मद्यधुंद अवस्थेत विद्यार्थ्यांना आढळून आले. शिक्षक जी. आर. मरसकोल्हे हे शिक्षक दारूच्या नशेत चक्क वर्ग खोलीत जमिनीवर लोळलेले होते. त्यांना रुग्णवाहिकेने रूग्णालयात नेण्यात आले.
शिक्षक म्हणाले की समाजाला आदर्श व्यक्तिमत्त्व घडवून देणारा चेहरा रेखाटला जातो. परंतु आदर्श घडवून देणाऱ्या याच शिक्षकाने आपल्या पेशाला काळीमा फासला. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्याच्या निंबा येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे आणि याच शाळेत जी. आर. मरसकोल्हे हे शिक्षक पदावर कार्यरत आहेत. शुक्रवारी सकाळी रोजच्या वेळेवर शाळेत विद्यार्थी पोहोचले तेव्हा बघितले तर काय! शिक्षक मरसकोल्हे हे एका वर्गात चक्क अस्ताव्यस्थ अवस्थेत लोळले आहेत.
हे बघून विद्यार्थी घाबरले आणि अन्य शिक्षकांसोबत लोकांना याची माहिती दिली. त्यानंतर शिक्षक मरसकोल्हे यांना उठवण्याचे प्रयत्न सुरू झाले परंतु ते इतके नशेत होते की, त्यांना उठता देखील येत नव्हतं. अखेर रुग्णवाहिका आणि पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी पंचनामा करून मरसकोल्हे यांना रुग्णवाहिकेने रूग्णालयात रवाना केले.
मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षक मरसकोल्हे यांना आधी पासूनच दारूचे व्यसन असून तीन वर्षांपुर्वी त्यांना निलंबित करण्यात आले होते. आता पुन्हा ही घटना झाल्याने निंबा गावाचे सरपंच वर्षा पटले, पंचायत समिती सदस्य राकेश पंधरे, बुधवार बोजेवारसह संताप गावकरी आणि पालकांनी पोलीस ठाणे गाठून शिक्षक जी. आर. मरसकोल्हेंच्या विरोधात तकरार नोंदवली आहे. दुसरीकडे शिक्षण विभागानेही याचे नोंद घेतलेली असून शिक्षक जी. आर. मरसकोल्हे यांच्या विरुद्ध विभागीय कार्यवाही सुरू केली आहे.

Leave a Reply