हे देखील माहित असू द्या….

आज पासुन उत्तरायण आरंभ होत आहे. या बद्दलची माहिती घेऊ,

अयन खरे कोणते ?

लेखाचे शीर्षक बुचकळ्यात टाकणारे आहे.
उत्तरायण, दक्षिणायन हे शब्द ज्यांनी ऐकले आहेत
त्यांना प्रश्न पडेल की, ‘अयन’ ही घटना आहे.
जे घडते ती घटना.
मग त्यात खरे ? खोटे ? हा प्रश्न कुठे आला.
काहींना मूलभूत प्रश्न पडेल की अयन म्हणजे काय ?
हेच आम्हाला माहीत नाही.
खरे की खोटे हा प्रश्न त्यानंतरचा.
चला तर मग …
‘अयन’ ही संकल्पना समजावून घेऊ या.
आपले निरीक्षण काय सांगते ?

आपण क्षितीजावर उदय पावणारे..,
किंवा मावळणारे सूर्यबिंब पहा.
काही दिवसांच्या निरीक्षणाने असे लक्षात येईल की ,
दररोजचा सूर्योदय किंवा सूर्यास्त
क्षितीज संदर्भाने एकाच ठिकाणी होत नाही.
उदय पावणाऱ्या किंवा अस्तास जाणाऱ्या सूर्यबिंबाची जागा
उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे हळूहळू सरकते.
दीर्घ निरीक्षणाने आपल्या हे सुद्धा लक्षात येईल की ,
सूर्यबिंबाची जागा क्षितीज संदर्भाने सरकण्यासही
एक मर्यादा आहे.
आयाम (amplitude) आहे.
उदाहरणार्थ झोपाळा….
झोपाळा काही जत्रेतील पाळण्यासारखा संपूर्ण फिरत नाही.
दोन्ही टोकाकडे तो विशिष्ट मर्यादेपर्यंतच जातो.
या मर्यादेलाच आयाम म्हणतात.

सूर्याचा उत्तर-दक्षिण आयाम ::

क्षितीज संदर्भाने सूर्याची उदयाची किंवा अस्ताची जागा उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे विशिष्ट मर्यादेत बदलणे यास आपण सूर्याचा आयाम म्हणू या. असे का घडते ते पाहू या. पृथ्वीचे विषुववृत्त (equator) हा शब्द आपणास परिचयाचा आहे. पृथ्वीच्या विषुववृत्ताला समांतर असे एक वर्तुळ आकाशात स्थित आहे असे समजा.
या वर्तुळाला आपण आकाशातील विषुववृत्त (celestial equator) किंवा वैषुविकवृत्त म्हणू या. सूर्याभोवती परिभ्रमण करणाऱ्या पृथ्वीचा आस २३.५ अंशाने कलता आहे असे आपण ऐकलेले असते पण या कलतेपणाच्या परिणामाचा आपण पुरेसा विचार केलेला नसतो. या कलतेपणामुळे पृथ्वीच्या परिभ्रमणाचा मार्ग (कक्षा) आणि वैषुविकवृत्त एकमेकांना छेदतात. उगवत्या किंवा मावळत्या सूर्याची क्षितीज संदर्भाने उत्तर दक्षिण दिशेत विशिष्ट मर्यादेत जागा बदलणे हा या कलतेपणाचा निरीक्षणाने अनुभवाला येणारा परिणाम आहे. क्षितीजावरील पूर्व बिंदूच्या उत्तरेस २३.५ अंशावर जाण्याची कमाल मर्यादा सूर्याने गाठली की तो दक्षिणेकडे येऊ लागतो यास दक्षिणायन म्हणतात. या उलट पूर्वबिंदूच्या दक्षिणेस २३.५ अंशावर जाण्याची कमाल मर्यादा सूर्याने गाठली की तो उत्तरेकडे येऊ लागतो यास उत्तरायण म्हणतात. अशा तऱ्हेने उत्तरायण किंवा दक्षिणायन ही सूर्याच्या संदर्भाने आपल्याला अनुभवायला येणारी नैसर्गिक घटना आहे.

पृथ्वी ३६५ दिवसांमध्ये सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते. हे जरी सर्वांना माहीत असले तरी तिचा स्वतःभोवती फिरण्याचा अक्ष सरळ नसून २३. ५ अंशाने कललेला आहे हे मात्र अनेकांना माहित नसते.
पृथ्वी २३. ५ अंशाने एका बाजूस कललेली आहे आणि त्याच परिस्थितीमध्ये ती सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करते. ह्या कललेल्या अवस्थेमुळे काय परिणाम होतात ते जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम आपण पृथ्वीची कललेली स्थिती एका उदाहराणाने समजावून घेऊया. एका टेबलावर मधोमध चेंडू ठेवा आणि असे समजा की तो सूर्य आहे. आता हातामध्ये एक पेन घ्या. पेनाचा आकार गोल नसला तरी थोड्या वेळासाठी त्याला आपण पृथ्वी समजूया. आता पेनाला सरळ उभे धरलेल्या अवस्थेमध्ये सूर्य असलेल्या चेंडू भोवती फेरी मारा. पेनाने चेंडू भोवती फेरी मारताना एक गोष्ट आपणास कळेल की सर्व बाजूंनी पेनाचे चेंडूपासूनचे अंतर सारखेच होते.

आता हातामध्ये पकडलेला पेन सरळ न पकडता थोडासा तिरका पकडा आणि त्याच अवस्थेमध्ये चेंडू भोवती एक फेरी मारा. आता आपणास कळेल की पेनाची वरची एक बाजू एकवेळेस चेंडूच्या जवळ येते तर त्याच्या विरुद्ध ठिकाणी ती बाजू दूर जाऊन पेनाची खालची बाजू चेंडूच्या जवळ येते तर दोन समोरासमोरील ठिकाणी पेन आणि चेंडू मधील (म्हणजे पृथ्वी आणि सूर्य) अंतर सारखेच असते.
पृथ्वीदेखील कललेल्या अवस्थेमध्येच सूर्याभोवती फेरी मारीत असल्याने काही वेळेस पृथ्वीचा उत्तर ध्रृवाकडील भाग सूर्याच्या जवळ येतो. तर सहा महिन्यांनी पृथ्वीच्या दक्षिणेकडील भाग सूर्याच्या जवळ येतो. तर सहा महिन्यांच्या अंतराने दोन दिवशी सूर्य-पृथ्वी अंतर सारखेच असते.

पृथ्वीची जी बाजू सूर्याच्या जवळ असते तेथे उन्हाळा तर जी बाजू दूर असते तेथे हिवाळा असतो. कमी-जास्त तापमानामुळे ऋतू होतात. जर अक्ष कललेला नसता तर ऋतू झालेच नसते.
आपण जर दररोज सूर्याच्या उगवण्याच्या किंवा मावळण्याच्या जागेचे निरीक्षण केले तर सूर्याची बदललेली जागा लक्षात येईल. ज्यावेळेस पृथ्वीची उत्तर ध्रृवाकडील बाजू सूर्याच्या जवळ येते तेव्हा सूर्य जास्तीत जास्त उत्तरेला सरकलेला असतो. २१ मार्च ते २१ जून पर्यंत सूर्य उत्तरेला सरकतो. यालाच ‘उत्तरायण’ असे म्हणतात. तर २२ सप्टेंबर तर २२ डिसेंबर पर्यंत सूर्य दक्षिण दिशेस सरकतो. यालाच ‘दक्षिणायन’ असे म्हणतात. तर २२ मार्च आणि २२ सप्टेंबर या दोन दिवशी सूर्य बरोबर पूर्व दिशेस उगवतो. ह्या दोन तारखांना ‘विषुवदिन’ असे म्हणतात. ह्या दिवशी दिवस-रात्र समान बारा-बारा तासांचे असतात.
सारांश रूपाने सूर्याच्या तीन भ्रमणांचा आपण उल्लेख करू.

१) सूर्य क्षितीजाच्या पूर्व भागात उगवून पश्चिम भागात मावळतो. हे सूर्याचे दैनिक भ्रमण आहे. हा पृथ्वीच्या परिवलनाचा (rotation) परिणाम आहे.

२) तारकांच्या संदर्भाने सूर्याची जागा पश्चिमेकडून पूर्वेकडे थोडी थोडी सरकत जाते (दररोज साधारण १ अंश) हा पृथ्वीच्या परिभ्रमणाचा परिणाम आहे.

३) सूर्याची उगवण्याची किंवा मावळण्याची जागा उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे हळूहळू सरकत जाते हा पृथ्वीच्या कलतेपणाचा परिणाम आहे. या तीनही गोष्टी एकाचवेळी होत असतात. यातील ‘अयन’ या घटनेचा विशेष विचार करू.
सूर्याचे स्थान आणि परिभाषा.

कालमापनासाठी सूर्याच्या गतीचा आपण उपयोग करून घेतला. पृथ्वीची सूर्याभोवतीची एक प्रदक्षिणा म्हणजे “वर्ष” असे परिमाण आपल्याला मिळाले. वर्षाच्या ३६५ दिवसांचे स्थूलमानाने चार भाग आपणास निसर्गतःच करता आले. त्याचा संदर्भ म्हणजे सूर्यमार्गावरील (आयनिकवृत्त) सूर्याचे वैषुविकवृत्ताच्या संदर्भाने असणारे स्थान.

आयनिक वृत्त (सूर्याचा वार्षिक भ्रमण मार्ग) आणि वैषुविकवृत्त यांचे अर्थातच १८० अंशाच्या फरकाने असलेले दोन छेदनबिंदू यांना संपात बिंदू म्हणतात. (equinoctial points) ज्या बिंदूपाशी आल्यानंतर सूर्याचा पुढचा प्रवास वैषुविकवृत्ताच्या उत्तर बाजूस होतो. तो संपात बिंदू “वसंत संपात बिंदू (Vernal equinox)” म्हणून ओळखला जातो. या बिंदूपासून साधारण तीन महिन्यांनी सूर्य वैषुविकवृत्ताच्या उत्तरेस २३.५ अंश जाण्याची कमाल मर्यादा गाठतो. या बिंदूला उत्तरविष्टंभ बिंदू (Summer Solstice) म्हणतात. येथून माघारी म्हणजे दक्षिणेकडे वळतो. ही एक घटना आहे. ती घडण्याचा एक क्षण असतो. या घटनेलाच आपण दक्षिणायन असे म्हणतो. याची तुलना आपल्याला व्यावहारिक उदाहरणाने करता येईल. विवाह अमुक दिवशी आहे असं आपण म्हणतो पण “लग्न लागणे” हा क्षण असतो. तसंच दक्षिणायन अमुक दिवशी आहे असे आपण म्हणतो. परंतु सूर्य उत्तरविष्टंभ बिंदूपाशी असण्याचा एक क्षण (एक विशिष्ट वेळ) असते.

सूर्य स्थानांचा वेगळा संदर्भ – नक्षत्रे, उत्तरायण, दक्षिणायन या घटनांचा संदर्भ आपण ‘कॅलेंडर’ च्या तारखांच्या संदर्भात बघितला पण पूर्वी म्हणजे वेदकाळात या घटनांच्या संदर्भासाठी नक्षत्रांचा वापर करीत असत. साधारण १७०० वर्षांपूर्वी सूर्य रेवती नक्षत्र विभागात असतांना वसंत संपात बिंदूशी असे. किंबहुना वसंत संपात बिंदू रेवती नक्षत्रांत होता असे म्हणणे अधिक योग्य ठरेल. नक्षत्र किंवा राशीचक्राची सुरुवात वसंत संपात बिंदूपासून करण्याची पद्धत असल्यामुळे रेवती नंतर येणारे अश्विनी नक्षत्र हे पहिले नक्षत्र आणि अश्विनी नक्षत्रापासून सुरु होणारी मेष रास ही पहिली रास ठरली परंतु पृथ्वीच्या एका विशिष्ट गतीमुळे (परांचन गती) संपात बिंदू तसेच विष्टंभ बिंदू नक्षत्रात स्थिर रहात नाहीत. हे बिंदू उलट क्रमाने म्हणजे मागच्या नक्षत्रात सरकतात. यातील प्रत्येक बिंदू साधारण ७२ वर्षात एक अंश मागे सरकतो, परंतु आपली पंचांगे नाक्षत्र वर्ष मानतात. नाक्षत्र वर्ष म्हणजे समजा सूर्याने आज अश्विनी नक्षत्रात आणि मेष राशीत प्रवेश केला की पुन्हा नक्षत्रात येईपर्यंत जो कालावधी त्याला नाक्षत्र वर्ष (sidereal year) म्हणतात. (परंतु संपात बिंदू पश्चिमेकडे सरकत असल्यामुळे संपात बिंदू ते पुन्हा तोच संपात बिंदू या सूर्य आवर्तनाने होणारे ऋतूंचे वर्ष, [सांपातिक वर्ष (tropical year)] नाक्षत्र वर्षांपेक्षा लहान होते. सुमारे १७०० वर्षापूर्वी दक्षिण विष्टंभ बिंदू आणि मकर राशीचा आरंभ यांची सांगड होती. त्यामुळे मकर राशीत सूर्याने प्रवेश केला की उत्तरायणही सुरू होत असे. पण ऋतूंचे वर्ष म्हणजे उत्तरायण हा काळ नाक्षत्र वर्षापेक्षा थोडा कमी असल्यामुळे उत्तरायण अगोदर होते आणि सूर्याचा मकर राशीतील प्रवेश पुढे पुढे सरकत जातो. आज मितीस दक्षिण विष्टंभ बिंदू आणि मकर राशीची सुरुवात यांच्यामध्ये २४ अंशाचे अंतर पडले आहे. त्यामुळे उत्तरायण २२ डिसेंबरला (राष्ट्रीय सौर १ पौष) होते तर मकर संक्रमण १४ जानेवारीच्या सुमारास होते.

मकर संक्रांतीच्या दिवशीचे …
तीळ गूळाचे महत्व पाहिले तर हा सण
सूर्याशी म्हणजे हिवाळ्याशी निगडीत आहे असे वाटते.

सूर्य जास्तीत जास्त दक्षिणेला असतो
तेव्हा म्हणजेच उत्तरायण सुरु होते ,
तेव्हा आपल्याकडे थंडी असते.
म्हणजे मकरसंक्रातीचा संबंध उत्तरायणाशी आहे.
सूर्याच्या मकर राशीतील प्रवेशाशी नाही.
उत्तरायण सुरु झाल्यानंतर सुमारे
२३ ते २४ दिवसांनी सूर्य मकर राशीत
प्रवेश करीत असल्यामुळे मकर राशीतील सूर्य प्रवेश
म्हणजे उत्तरायण दिवस हे खरे की खोटे ..?
हे वाचकांनीच ठरवयाचे आहे.

लेखक.. अज्ञात….
समाजमाध्यमावरुन साभार..

Leave a Reply