जयंत पाटील यांचे अधिवेशन काळापुरते निलंबन

नागपूर : २२ डिसेंबर – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना निलंबित करण्यात आलंय. विधानसभा अध्यक्षांना उद्देशून अपशब्द वापरल्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली आहे. नागपूर येथे सुरु असलेलं हिवाळी संपेपर्यंत त्यांचं निलंबन असेल. संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्या निलंबन करण्याचा ठराव माडंला होता.
विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू न दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील सभागृहात संतापले होते. या संतापात जयंत पाटील (Jayant Patil) यांनी विधानसभा अध्यक्षांना (Maharashtra Assembly Winter Session) असंसदीय शब्द वापरला होता. त्यानंतर सभागृहात मोठा गदारोळ झाला. सत्ताधाऱ्यांनी जयंत पाटील यांच्या निलंबनाची मागणी केली. सत्ताधाऱ्यांनी जयंत पाटील यांना एक वर्षासाठी निलंबित करण्याची मागणी केली होती. या गदारोळानंतर विधानसभेचे कामकाज 10 मिनिटांसाठी स्थगितही करण्यात आले होते. सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यानंतर संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला.

जयंत पाटील यांनी बेजबाबदारपणे वक्तव्य केलं. नागपुर अधिवेशन संपेपर्यंत त्यांना निलंबित करण्यात यावे. तसेच त्यांच्या वक्तव्यावर चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात यावी, असा ठराव चंद्रकांत पाटील यांनी मांडला. हा ठराव बहुमताने मंजूर झाल्यानंतर जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर जयंत पाटील यांनी सभागृहाचा त्याग केला.
नागपुरात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस सुरु आहे. यावेळी अभिनेता सुशांतसिंह राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सॅलियन हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची एसआयटी चौकशी केली जाईल, असं उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितलं. यावेळी विरोधकांना बोलू दिलं जात नाही, असं म्हणत विरोधीपक्षातील आमदार सभागृहाच्या वेलमध्ये उतरले. त्यावेळी ‘तुम्ही असा निर्लज्जपणा करू नका’ असं जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना सुनावले होते.
यावेळी जयंत पाटील यांनी वापरलेला शब्द विधानसभा अध्यक्षांना उद्देशून असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला. त्यानंतर काही वेळासाठी सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं. जयंत पाटील यांचं एका वर्षासाठी निलंबन करण्याची मागणी सत्ताधारी पक्षांनी केली होती.

Leave a Reply