आरोप करू नका, तुमच्या मोबाइल फोनवर पेगॅसस असल्याचे पुरावे सादर करा – अमित शाह

नवी दिल्ली : २२ डिसेंबर – ‘तुमच्या मोबाइल फोनवर पेगॅसस असल्याचे पुरावे सादर करा, लोकसभेचा वापर वाट्टेल ते आरोप करण्यासाठी करू नका’, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांना खडसावले. ‘देशासमोरील अमली पदार्थाचा धोका’ या विषयावरील अल्पकालीन चर्चेत बोलताना काँग्रेसचे खासदार गोगोई यांनी पेगॅसस सॉफ्टवेअरचा वापर करून देशातील राजकीय नेत्यांवर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप केला.
जल, वायू आणि भूमार्गाने देशात होणारी अमली पदार्थाची तस्करी रोखण्यासाठी केंद्र सरकारने कोणत्या सुरक्षा व देखरेख यंत्रणा व्यवस्था तैनात केल्या आहेत, देशाच्या सीमांवर गस्त वाढवण्यासाठी कोणते उपाय केले आहेत, असे सवाल गोगोई यांनी केले. हा मुद्दा मांडताना गोगोई यांनी, पेगॅसस या इस्रायल बनावटीच्या हेरगिरी करणाऱ्या सॉफ्टवेअरचा देशात गैरवापर केला जात असून राजकीय नेते, पत्रकारांवर पाळत ठेवली जाते. मग, पेगॅससच्या आधारे केंद्राने किती अमली पदार्थाचे तस्कर पकडले, असा तिरकस प्रश्न विचारला. गोगोई यांच्या विधानावर शहा यांनी आक्षेप घेतला. सभागृहात गोगोई अत्यंत गंभीर आरोप करत आहेत. पेगॅससचा वापर करून गोगोई यांचा मोबाइल फोन हॅक झाला असेल तर, त्याचा पुरावा सभागृहात सादर करावा. नसेल तर वाट्टेल ते आरोप करू नका, असे शहा म्हणाले.
सीमांची सुरक्षा ही केंद्राची जबाबदारी आहे. पण, सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) अधिकारांचा मुद्दा उपस्थित होतो, तेव्हा राज्ये अधिकारांवर गदा येत असल्याची ओरड करतात. पण, ‘बीएसएफ’ला राज्यांमध्ये काम करू दिले नाही तर, अमली पदार्थविरोधी मोहीम यशस्वी कशी होणार? ‘बीएसएफ’ने अमली पदार्थ जप्त केले पण, त्यांना गुन्हा नोंदवता आला नाही तर, त्यांच्या कारवाईला अर्थ उरणार नाही. अमली पदार्थविरोधी मोहिमेचे राजकारण करू नका. सुरक्षा यंत्रणांवर विश्वास ठेवा, असे आवाहन शहा यांनी बिगरभाजप राज्य सरकारांना केले.

Leave a Reply