येत्या ४ महिन्यांत राज्यातील शासकीय रुग्णालयात ४५०० रिक्त पदे भरणार – गिरीश महाजन

नागपूर : २१ डिसेंबर – राज्यातील शासकीय रुग्णालयात येत्या चार महिन्यात साडेचार हजार रिक्त पदे भरण्यात येईल. औषध पुरविण्याच्या ‘हाफकीन’च्या टक्केवारीत ९० वरून ७० टक्क्यापर्यंत कपात करण्यात येईल. त्यामुळे मेडिकल किंवा इतर संस्थांना औषध, सर्जिकल साहित्य खरेदीसाठी ३० टक्के निधी उपलब्ध होईल, असे आज वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सभेत सांगितले.
मेडिकलमध्ये वैष्णवी बागेश्वर या मुलीच्या व्हेंटिलेटरवर मृत्यू झाल्यानंतर खळबळ माजली होती. या घटनेचे पडसाद आज विधानसभेत उमटले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज सभेत मेडीकलमधील अव्यवस्था, रिक्त पदे, तंत्रज्ञाचा अभाव याकडे लक्षवेधीद्वारे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी लक्ष वेधले. वैष्णवीच्या मृत्यूनंतर मेडिकलचे अधिष्ठात्यांना कार्यमुक्त करून त्यांची विभागीय चौकशी करण्यात येत असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री महाजन यांनी सांगितले. मुंबईतील जेजे रुग्णालयाबाबतही लक्षवेधीला उत्तर देताना त्यांनी राज्यात शासकीय रुग्णालयात साडेचार हजार पदे भरण्यात येईल.
सध्या ‘हाफकीन’ला औषध पुरवठ्यासाठी ९० टक्के निधी दिला जातो तर संस्थेला १० टक्के निधी दिला जातो. परंतु हाफकिनकडून खरेदीत विलंब होत असल्याने औषध, साहित्यचा तुटवडा पडतो. त्यामुळे आता हाफकीनला ७० टक्के निधी देण्यात येईल तर मेडिकल किंवा इतर वैद्यकीय संस्थेला ३० टक्के निधी देण्यात येईल, त्यामुळे संस्थास्तरावर लवकर औषध, सर्जिकल साहित्य खरेदी करता येणार असल्याचे महाजन यांनी नमूद केले. नाना पटोले यांच्या तंत्रज्ञ नसल्याच्या आरोपवर त्यांनी तंत्रज्ञ आहेत, पण काही वेळेला अडचण होते, अपूर्णता आहे, ते पूर्ण करण्यात येईल, असे सांगितले.

Leave a Reply