विनाअनुदानित शाळेच्या मुद्द्यावरून छगन भुजबळांचा चंद्रकांत पाटीलांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

नागपूर : २१ डिसेंबर – मंत्री चंद्रकांत पाटील यांचं ‘भीक मागितली’ या वक्तव्याचा धागा पकडून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी विनाअनुदानित शाळेच्या मुद्द्यावर राज्य सरकारच्या धोरणावर उपहासात्मक टीका केली. शाळेसाठी सरकारी अनुदानावर अवलंबून राहू नका, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी करुन एकप्रकारे येणाऱ्या काळातली राज्य सरकारची भूमिकाच स्पष्ट केली होती. त्यावर आज विधानसभेत बोलताना छगन भुजबळ यांनी आपल्या गळ्यातील मफलर पसरत विनाअनुदानित शाळावाल्यांनी भीक मागितली तर चालेल का? असा उपहासात्मक सवाल केला. पण बचावासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तत्काळ उभे राहिले. त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. पण समोरच बसलेल्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मात्र फडणवीसांना हा वाद निकाली काढण्याची सूचना केली अन् फडणवीसांनी राज्य सरकारची भूमिका रोखठोक शब्दात स्पष्ट करताना एकप्रकारे चंद्रकांतदादांचीच अडचण केली.
विनाअनुदानित शाळा आणि अनुदानाच्या मुद्द्यावर विधासभेत चर्चा सुरु होती. त्यावर निवेदन करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलायला उभे राहिले. आता इथून पुढच्या काळात अनुदानित शाळा देता येणार नाही, हा आपला कायदा आहे, असं फडणवीस यांनी नि:क्षून सांगितलं. त्यांच्या निवेदनानंतर छगन भुजबळ बोलायला उभे राहिले.
“समाजातील सर्वच लोकांना शिक्षण देण्याची व्यवस्था आपल्याकडून पूर्ण होत नाही. म्हणून स्वयंसेवी संस्था पुढे येऊन विनाअनुदानित शाळा काढतात. पण शाळा काढल्यानंतर विद्यार्थ्यांचा किंवा शिक्षकांचा खर्च जर भागवायचा असेल तर त्यांनी काय करावं, असं म्हणत भुजबळ यांनी आपल्या गळ्यातील मफलर पसरत विनाअनुदानित शाळावाल्यांनी भीक मागितली तर चालेल का? असा उपहासात्मक सवाल केला.
भुजबळांना उत्तर द्यायला फडणवीस उभे राहिले. त्यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या ‘माझी जीवनगाथा’ या पुस्तकातील एक उतारा वाचून दाखवत प्रबोधनकारांनीच आपल्या पुस्तकात शाळांसाठीच्या भीकेचा उल्लेख केला होता, असं सांगतानाच फडणवीसांना चंद्रकांतदादांची बाजू घेण्याचा प्रयत्न केला.
मात्र चाणाक्ष अजितदादांनी हेच हेरुन तत्काळ आपण चंद्रकांतदादांच्या वक्तव्याशी सहमत आहात का? असा प्रश्न केला. अजितदादांच्या प्रश्नाला भुजबळ, वळसे पाटील यांनीही पुढे रेटलं. त्यावर फडणवीस जरासे गोंधळले. जरासे बॅकफूटला देखील गेले. विरोधकांनी थोडासा गोंधळ सुरु करताच “राज्य सरकार सगळी व्यवस्था करेल. कुणालाही भीक मागण्याची वेळ येणार नाही”, असं फडणवीस म्हणाले.
फडणवीसांच्या उत्तराने अजित पवारांचं समाधान झालं नाही. “आपल्या उत्तरात आणि चंद्रकांत दादांच्या भूमिकेत (अनुदानावर अवलंबून राहू नका) किती विरोधभास आहे. मग तुमचं म्हणणं खरं की चंद्रकांतदादांची भूमिका खरी?” असा थेट सवाल अजितदादांनी विचारला.
त्यावर सभागृहात जे बोललं जातं तेच खरं असतं, असं फडणवीस म्हणाले. चंद्रकांतदादांची बाजू सावरण्यासाठी उठलेल्या फडणवीसांना अजितदादा भुजबळांच्या हजरजबाबीपणापुढे एक पाऊल मागे येऊन आपल्या उत्तराने चंद्रकांतदादांचीच अडचण केली.

Leave a Reply