नागपुरातील भूखंड वाटपाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी विधानपरिषदेचे कामकाज रोखले

नागपूर : २० डिसेंबर – नगर विकास मंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी केलेल्या नागपूर सुधार प्रन्यासच्या भूखंड वाटपाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायालयाने या निर्णयावर ताशेरे ओढले आहे. या मुद्यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाने मंगळवारी विधानपरिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या मागणीला राष्ट्रवादीने आणि काँग्रेसनेही पाठिंबा दिला. या मुद्यावर सभागृहात प्रचंड गदारोळ झाल्याने सभागृहाचे कामकाज दोन वेळा तहकूब करण्यात आले आणि शेवटी गदारोळातच कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाचे कामकाज सुरू झाल्यावर विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी एन आय टी भूखंड वाटपाचा मुद्दा उपस्थित केला. एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असतानाच्या काळातील हा निर्णय असून न्यायालयाने याला स्थगिती देतांना मंत्र्यांवर ताशेरे ओढले आहेत त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी दानवे यांनी केली. दानवे बोलत असतानाच सत्ताधारी पक्षाचे सदस्य उठून उभे राहत त्यांनी जोरदार आक्षेप घेतला, ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासानंतर हा मुद्दा मांडा असा आग्रह धरला, मात्र दोन्ही पक्ष आपापल्या भूमिकांवर ठाम असल्याने सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. त्यामुळे पीठासीन सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कामकाज १५ मिनिटे तहकूब केले.
त्यानंतर पुन्हा कामकाज सुरू होताच सभागृहात पुन्हा गोंधळ सुरु झाला, राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना विरोधी पक्ष दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला.
फडणवीस बोलत असतांना कुणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, दोन्ही बाजूंचे सदस्य गदारोळ करीत होते, गदारोळात फडणवीस त्यांचे म्हणणे मांडत होते. एव्हाना शिवसेनेच्या मनीषा कायंदे, काँग्रेसचे अभिजित वंजारी, भाई जगताप यांच्यासह सुमारे ८-१० सदस्य अध्यक्षांच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत येऊन जोरदार घोषणाबाजी करू लागले. याचदरम्यान दुसऱ्यांदा उपसभापतींनी कामकाज पुन्हा १५ मिनिटांसाठी तहकूब केले. हे बघून फडणवीसांसह सर्वच सत्ताधारी संतापले आमचे उत्तरही का पूर्ण होऊ दिले नाही? असा सवाल त्यांनी केला. यावेळी कुणाचेही न ऐकता सभापती उठून निघून गेल्या.
या नंतर कामकाज सुरु झाल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दानवेंच्या आरोपांवर सविस्तर उत्तर दिले हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतांना यावर सभागृहात चर्चा नको होती, हा न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रयत्न होतो आहे, असे सांगून विरोधी पक्षनेत्यांनी चुकीचे मुद्दे मांडले असा दावा त्यांनी केला. यावर शिवसेनेचे अनिल परब यांनी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र सभापतींनी त्यांना थांबवले दरम्यान सभागृहात पुन्हा गोंधळ सुरु झाला, या गोंधळातच सभापतींनी प्रश्नोत्तरांचा तास संपला असून आजची बैठक उद्यापर्यंत तहकूब करत असल्याची घोषणा केली.

Leave a Reply