गडचिरोलीत मलेरियाचे थैमान

गडचिरोली : २० डिसेंबर – जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात समाविष्ट कवंडे या छोट्याशा गावात मलेरियाने थैमान घातले आहे. १८२ लोकसंख्या असलेल्या गावात ५६ जणांमध्ये मलेरियाचे संक्रमण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकारीच नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य विभागात नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राज्याच्या शेवटच्या टोकावर वसलेला भामरागड तालुका मलेरियाचे ‘इंडेमिक झोन’ आहे. तालुका मुख्यालयापासून जवळपास २८ किलोमीटर अंतरावर नेलगुंडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कवंडे गावाची लोकसंख्या १८२ एवढी आहे. त्यापैकी १५२ गावकऱ्यांची तपासणी करण्यात आली. यात एकूण ५६ जण हे मलेरियाने संक्रमित असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. हे गाव छत्तीसगड सीमेलगत आहे. भामरागड तालुक्यातील बहुतांश नागरिक छत्तीसगड गाठण्यासाठी याच गावातून मार्गक्रमण करतात. त्यामुळे हे गाव एक आकर्षणाचा भाग बनले आहे. मात्र या गावात ५६ नागरिक मलेरियाने संक्रमित आहेत. त्यात १ वर्षांपासून ते १४ वर्षांपर्यंतच्या ४० बालकांना मलेरिया झाला आहे. उर्वरित प्रौढ असल्याची माहिती समोर येत आहे. यात मलेरिया पी. व्ही. चे ३ रुग्ण आणि ५३ रुग्ण हे मलेरिया पी. व्ही. आणि पी. एफ. चे मिश्र प्रमाणात आहेत.
लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत एकूण ९ उपकेंद्र आहेत. मिडदापल्ली उपकेंद्रात कवंडे या गावाचा समावेश होतो. या ठिकाणी सामूदायिक आरोग्य अधिकारी म्हणून असलेल्या डॉ. स्नेहा ठिन्गने मागील १५ दिवसांपासून रजेवर आहेत. तर, सात उपकेंद्र समाविष्ट असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील १५ दिवसांपासून वैद्यकीय अधिकारीच नाहीत. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात नियोजन शून्य कारभार सुरू असल्याने नागरिकांमधून रोष व्यक्त केले जात आहे. त्वरित वैद्यकीय अधिकारी न दिल्यास कुलूप ठोकण्याचा इशारा काही दिवसांपूर्वी लाहेरी येथील नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला दिला होता.

Leave a Reply