घटस्फोट हवा म्हणून पतीने इंजेक्शनमधून पत्नीला दिले एचआयव्हीबाधित रक्त

नवी दिल्ली : १९ डिसेंबर – पतीने पत्नीला इंजेक्शनच्या माध्यमातून एचआयव्हीबाधित रक्त दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटस्फोट हवा असल्याने ४० वर्षीय पतीने हे कृत्य केलं. पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीला घटस्फोट देण्यासाठी पती कारण शोधत होता. यासाठीच त्याने पत्नीला एचआयव्हीबाधित रक्त देण्याचा कट आखला होता. आंध्र प्रदेशात ही घटना घडली आहे.
शुक्रवारी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत एम चरण याला ताब्यात घेतलं. पत्नीने केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.
आपण वैद्यकीय तपासणीसाठी गेलो असता याची माहिती मिळाल्याचं पीडितीने सांगितलं आहे. तिने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, पतीने आपल्याला चांगल्या आरोग्यासाठी इंजेक्शन देत असल्याचं सांगत नेलं होतं. दांपत्याला एक मुलगी आहे.
पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, २०१८ पर्यंत त्यांचा संसार व्यवस्थित सुरु होता. पण नंतर पतीने अतिरिक्त हुंड्याची मागणी सुरु केली आणि मुलगा हवा यासाठी दबाव टाकू लागला. आपल्या पतीचे २१ वर्षाच्या तरुणीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचाही तिचा आरोप आहे. यामुळेच पती आपला छळ करत असून, घटस्फोटाची मागणी करत असल्याचा तिचा दावा आहे.

Leave a Reply