भारताच्या पूर्व किनारपट्टीवर घोंगावत आहे नवे चक्रीवादळ, पंतप्रधानांनी घेतली आढावा बैठक

नवी दिल्ली : २३ मे – भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर नुकतंच ‘तौते’ चक्रीवादळ धडकल्यानंतर बसलेल्या धक्क्यातून बचावकार्य करणाऱ्या यंत्रणा सावरल्या नाहीत, तोच आता भारताच्या पूर्व किनारपट्टीवर नवं चक्रीवादळ घोंघावू लागलं आहे. ‘यास’ चक्रीवादळ येत्या २६ मे रोजी ओडिशा आणि पश्चिम बंगाल किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या बैठकीत चक्रीवादळाशी लढण्याबाबत उपाययोजनांचा पाढा वाचला गेला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत वरिष्ठ अधिकारी, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थआपन विभागातील प्रतिनिधी, दूरसंचार, वीज, नागरिक उड्डयण आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयातील सचिव यांची उपस्थिती होती. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ह सुद्धा उपस्थित होते. या बैठकीत आरोग्यविषयक यंत्रणा सज्ज ठेवण्याचे देखील निर्देश मार्गदर्शक सूचनांमध्ये देण्यात आले आहेत. चक्रीवादळामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य परिस्थितीसाठी एनडीआरएफच्या तुकड्या देखील सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार २६ मे रोजी यास चक्रीवादळ पश्चिम बंगाल किंवा ओडिशा या राज्यांच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. मात्र, केंद्र सरकारने सुरक्षेचा उपाय म्हणून पश्चिम बंगाल आणि ओडिशासोबतच आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि अंदमान-निकोबारमधील प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देखील या राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून किनारी भागामध्ये आरोग्य व्यवस्था अधिक वाढवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय, यास चक्रीवादळाच्या मार्गात येणाऱ्या प्रदेशामध्ये असलेल्या रुग्णालयांमधील रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी आवश्यक ती सर्व प्रकारची मदत देण्याचं आश्वासन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलं आहे.

Leave a Reply