पंतप्रधान भारत-चीन वादासंदर्भात चर्चेपासून पळ काढून ती टाळत आहेत – काँग्रेसचा आरोप

जयपूर : १९ डिसेंबर – पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत-चीन वादासंदर्भात संसदेत चर्चेपासून पळ काढून ती टाळत आहेत, असा आरोप काँग्रेसने केला. चीनच्या मुद्दय़ावर संरक्षणमंत्र्यांनी नव्हे तर पंतप्रधान मोदींनी उत्तर द्यावे. मोदी ‘चीन’ हा शब्द उच्चारतही नाहीत, असा आरोप करून, चीनशी जवळच्या संबंधांमुळे सरकार मौन बाळगून आहे का, असा सवालही काँग्रेसने केला.
अरुणाचल प्रदेशातील तवांग क्षेत्रात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीनंतर काही दिवसांनी सरकारला विरोधकांनी टीकेचे लक्ष्य केले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी राजस्थानमध्ये सुरू असलेल्या ‘भारत जोडो यात्रें’तर्गत सकाळच्या पदयात्रेनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले, की, १९८८ मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी चीनला भेट दिली होती. तेव्हा सीमेवर भारताची मजबूत स्थिती होती व या भेटीनंतर द्विपक्षीय संबंध आणखी दृढ झाले होते. एप्रिल २०२० मध्ये मात्र हे सर्व संपुष्टात आले व नवाच ‘अध्याय’ सुरू झाला. विद्यमान पंतप्रधानांनी आपल्या हद्दीत कोणीही घुसखोरी केलेली नाही. तसेच सध्या कोणीही आमच्या हद्दीत नाहीत, असे सांगून चीनला दोषमूक्त (क्लीन चिट) ठरविले आहे. त्यामुळे उभय राष्ट्रांतील वाटाघाटींच्या दृष्टीने बाजू कमकुवत झाली आहे. या मुद्दय़ावर संसदेत चर्चा व्हायला हवी आणि पंतप्रधानांनी यावर निवेदन द्यावे. विरोधकांशी चर्चा करावी. लोकसभा आणि राज्यसभेत चर्चा होऊन, या प्रश्नी संरक्षण अथवा परराष्ट्र मंत्र्यांऐवजी पंतप्रधानांनी उत्तर दिले पाहिजे. अशा संवेदनशील प्रश्नांवर पूर्वी अनेक पंतप्रधानांनी संसदेत उत्तरे दिली आहेत. मोदी असे पहिले पंतप्रधान आहेत जे या चर्चेपासून पळ काढत आहेत. ‘चीनवर मौन सोडा, भारत जोडा’ असे आवाहनही रमेश यांनी यावेळी मोदींनी केले.
काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा पत्रकार परिषदेत म्हणाले, की पंतप्रधानांना चीनवर चर्चा नको आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून मोदींचे चीनशी घनिष्ठ संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले, की ‘शूर सैन्य अन् भित्रा राजा’ या कथेसारखी स्थिती आहे. यापूर्वी भाजपचे नेते चिनी साम्यवादी पक्षासह प्रशिक्षणासाठी चीनला गेले होते. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा संबंध असलेल्या ‘विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशन’सारख्या संस्थांचे चीनशी कोणते संबंध आहेत? ‘थिंक टँक’च्या एका शाखेचे प्रमुख परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे पुत्र आहेत. त्याला चीनच्या दूतावासाकडून तीनदा देणग्या मिळाल्या आहेत.

Leave a Reply