जीटी एक्सप्रेसमधून उतरलेल्या इसमाकडे ६० लाख रुपये सापडले

नागपूर : २३ मे – नागपूर रेल्वे स्थानकावर जीटी एक्स्प्रेसमधून उतरलेल्या एका व्यक्तीकडे ६0 लाख रुपये आढळून आले. त्यामुळे या व्यक्तीला ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी त्यास आयकर विभागाकडे सोपविण्यात आले. हा व्यक्ती जीटी एक्स्प्रेसमधून उरल्यानंतर रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील संत्रामार्केट येथील ओव्हरब्रिजवरून ट्रॉलीबॅगसह जात होता.
रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक आर. एल. मीना हे सिकंदर यादव, कामसिंह ठाकूर यांच्यासोबत सकाळी १0.१0 वाजता प्लॅटफार्म क्रमांक ८ वर गस्त घालत असताना संबंधित व्यक्ती हा संशयास्पद स्थितीत आढळून आला. यावेळी रेल्वे सुरक्षा दलाकडून या व्यक्तीला थांबवून बॅगमध्ये काय आहे, अशी विचारणा करण्यात आली. यावेळी या व्यक्तीने बॅगमध्ये रोख रक्कम असल्याची माहिती दिली. या व्यक्तीने त्याचे नाव शब्बीर हुसेन हसन अली कारंजावाला (५५) रा. घर क्रमांक ८५८, इतवारी रोड राजा मशीदजवळ, बंगाली पंजा असे सांगितले. दरम्यान, रोकड मोठी असल्यामुळे पोलिसांनी विचारपूस करण्याकरिता या व्यक्तीला आरपीएफ ठाण्यात आणले. चौकशीत त्याने आपण इस्माईल अँण्ड सन्स पाचपावली रोड गांजाखेत चौक येथे नोकरी करीत असल्याची माहिती दिली. इटारसी रेल्वेस्थानकावरून जीटी एक्स्प्रेसने (कोच क्रमांक बी-२, बर्थ ३८) इस्माईल अँण्ड सन्सची रोख रक्कम घेऊन आपण आलो असल्याचे त्याने सांगितले. सुरक्षा दलाने त्यांच्या बॅगची पाहणी केली असत त्यात ५00 रुपयांच्या १२ हजार नोटा अर्थात एकूण ६0 लाख रुपये, ४९ कागदपत्रे आणि प्रवासाचे तिकीट आढळले. दरम्यान, जप्त केलेली रक्कम, कागदपत्रांसह संबंधित व्यक्तीला आयकर विभागाच्या स्वाधीन करण्यात आले.

Leave a Reply