सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

बाप्तिस्मा २

न् खोमा (Nkhoma) एक नयनरम्य ठिकाण मालावी देशातील. “न” ह्याच्यात सायलेंट आणि उच्चार “खोमा”. अतिशय मस्त ठिकाण. हिवाळ्यात थंडी ५-६ डिग्री पर्यंत. डोंगरावर वसलेले गाव, वस्ती साधारण एक लाखभर, गावाला महत्व आले ते गावातील “खोमा मिशन हॉस्पिटल” मुळे. २५० खाटांचे हॉस्पिटलमुळे गावाची रया बदलली. १८८९ मध्ये स्कॉटिश मिशनरी चे अॅन्ड्र्यु मुर्रे ह्यांनी स्थापना केली.
संपूर्ण गावात एक सुद्धा सरळ रस्ता नाही, सगळे रस्ते चढ-उताराचे, वळणाचे, झालेल्या वस्त्यांप्रमाणे फिरवलेले.
अगदी चर्च सुद्धा अतिशय उताराच्या रस्त्यावर . “सेंट्रल आफ्रिका प्रेसबायटेरियन चर्च” साधारण इ.स.१९२४ मध्ये स्थापना झाली.

हॉस्पिटल चा बहुतेक कर्मचारी युरोपियन आहेत. स्कॉटिश, आयर्लंड, नेदरलँड्स इथुन सगळी डॉक्टर मंडळी येतात. एकदा इथे ही डॉक्टर मंडळी चिकटली की सरळ निवृत्त होत पर्यंत इथेच राहतात.
खोमा माऊंटेन इथले दुसरे आकर्षण. माथ्यावरती फक्त झोपायला गादी आणि पांघरूण, सकाळी थोडे गरम पाणी मिळते. सगळे पर्वतारोही साधारण पौर्णिमेच्या आसपास शनिवारी, रविवारी सकाळी जातात आणि संध्याकाळच्या आत परत येतात आणि रात्री मुक्काम ठोकणारे गृप ने जातात, आपले जेवणाचे सामान, विजेरी वगैरे छोट्या छोट्या अत्यावश्यक गोष्टी, पाठीवरच्या मोठ्या पिशवीत घेतात. रात्र उघड्यावर छोट्या टेंट मध्ये मस्त गप्पा टप्पा मारत घालवतात आणि पहाटे पहाटे परतीला निघतात.
ह्या पर्वताच्या एका भागाला हॉस्पिटल तर दुस-या भागाला आमचे प्रोजेक्ट. लार्सन अॅंड टुब्रो कडुन ह्या प्रोजेक्टवर असतानाचा हा अनुभव. निसर्ग तर इतका मस्त इथला आणि मस्त थंडी. अगदी प्रथम दर्शनी निसर्गाच्या प्रेमात पडतो माणूस. रस्त्या कडे लगत उंच उंच झाडे, दुपारी झाड्यांच्याउपर उन आणि रस्त्यावर सावली. निसर्गाच हे रुप म्हणजे मज्जा मज्जा. सकाळी सकाळी ४-५ कप कॉफी सहज कोणी ही गटकुन जातो इथे.
मी मुद्दाम माझे राहण्याची सोय खोमाला करून घेतली. राहण्यासाठी हॉस्पिटल प्रमुख “डॉक्टर रे” ह्यांचे गेस्ट हाऊस अतिशय निसर्गरम्य.खोमा माउंटेनचा रस्ता ह्या गेस्ट हाऊस समोरुन जातो. खोमा साधारण १२४० मीटर उंचीवर, समुद्र सपाटी पासून आणि माझे गेस्ट हाऊस अगदी खोमा पर्वताच्या पायथ्याशी, किर्र झाडीत गुडुप्प. साधारण ८ छोट्या छोट्या गोलाकार ( इथल्या पारंपरिक घराचा आकार) पण ऐसपैस खोली, अटॅच टॉयलेट-बाथ, झोपायचा मोठ्ठा पलंग, स्टडी आणि छोट्टीशी प्रेयर स्पेस.
दार उघडून बाहेर या … मस्तपैकी निसर्गाच्या सान्निध्यात बसायला बाकं आणि रात्री शेकोटी पेटवण्याची सामग्री. तिथुन दोन पाय-या वर चढा, ४-५ गोल लाकडाच्या छत्री वजा झावळ्या लावलेल्या छताखाली लावलेल्या लाकडाच्या टेबल खुर्च्या.. मस्त केव्हाही या चहा कॉफी पित बसा. उतारावर लावलेला हा सरंजाम. दहा वीस पावलांची चढण चढा, दोन उंच भल्या मोठ्या वृक्षांना लाललेली झोपाळ्याची जाळी, मस्त आपली उशी घेऊन यायची, पुस्तक घेऊन झोपत झोपत वाचायचं, ह्या झोपाळा वजा जाळीवर. अगदी भर दुपारी. इथे सुर्यकिरणांना जमिनीवर पोचायला परवानगी नाही. आणि येणा-या पाहुण्याला कुठल्याही प्राण्याचा त्रास नको म्हणुन २कुत्रे सदैव तुमच्या दिमतीला. कुठलाही प्राणी गर काही धोका असेल तर कुत्रे तुम्हाला सुचित करणार. अजुन ५० पावले वर चढले की तिथे कॉमन किचन. आपापले जेवण बनवायचे आणि तिथे डायनिंग टेबलवर बसून जेवायचे. अजुन लोकांना बसायची भली मोठी व्यवस्था केलेली ह्या खोलीत आणि लायब्ररी वजा पुस्तकांनी ५-६ पारदर्शी कपाटं भरलेली पुस्तकांनी.
स्वर्ग म्हणतात तो हाच…. असो पुष्कळ झाले निसर्गरम्य परिसराचे पाल्हाळ…
तर अशा निसर्गरम्य ठिकाणी कार्यरत असताना, इथले ख्रिश्चन धर्माचे वर्चस्व जाणवायचे. रविवारी अगदी सगळे काळे मालावियन हटकुन हातात बायबल, गळ्यात टाय, अंगावर कोट आणि पॅंट पट्ट्याने बांधलेली अशा तयारीत चर्च ला उपस्थित राहणार.
आपलं स्वतः ची ओळख विसरून संपुर्ण पणे बाप्तिस्मा झालेलं गाव म्हणजे “खोमा”.
एक दिवस प्रोजेक्ट चे परिसराबाहेर अॅप्रोच रस्ता कुठपर्यंत झाला हे बघण्यासाठी बाहेर पायीच निघालो. तर जवळच्या झाडीतून गावचा “चेवा” स्थानिक समुहाचा मुखिया बाहेर आला आणि स्थानिक “चिचेवा” भाषेत संवाद साधण्याचा प्रयत्न करत होता. मी एका स्थानिक कामावरच्या दुभाषाला बोलावले आणि विचारले ह्याचे म्हणणे काय आहे?
त्याने सांगितले, तुम्ही (मी) ख्रिश्चन नाही. हे खात्रीने सांगतो, तो माझ्यावर पाळत ठेवून होता आणि मी ख्रिश्चन नाही ही खात्री पटल्यावर तो मला भेटायला आला. पुढे तो बोलु लागला. आता आम्ही ह्या गावात फक्त ३५० लोकं उरले आहोत बाकी सगळे ह्यांनी कपटाने ओढुन ओढून ख्रिश्चन बनवले आहेत. मोठ्या मदतीच्या अपेक्षेने तो माझ्याकडे आला होता. आता उरलेले लोकांना सुद्धा सळो की पळो करून ठेवले आहे. हॉस्पिटल सुद्धा लोकांना ख्रिश्चन बनवण्याचे एक साधन आहे. कसे ही करा पण आम्हाला ख्रिश्चन होण्यापासून वाचवा…..
आपल्या धर्माचे रक्षण करण्याची आर्त इच्छा, आटापिटा, पिडा ह्यातुन तो माझ्याकडे आला होता. आपल्या स्थानिक परंपरेला त्याला सांभाळायचे होते म्हणून तो माझ्याकडे आला होता. आफ्रिकन जमातीला उल्लु बनवत, त्यांच्या गरीबीचा फायदा घेत ख्रिश्चन मिशनरीज त्यांचे धर्महरण करत असतात आणि गो-या वलयामागे लपलेला, आपला खरा चेहरा धर्मांतरण करायला वापरत असतात. त्यांचे मृदू बोलणे, त्यांचे वागणे, करुणा वगैरे एक तुमच्यावर फेकलेले जाळे असते. फसता का फसत नाही, हे पिच्छा पुरवत शेवटपर्यंत तुमच्याकडे व्यवस्थित जाळ्यात ओढत असतात, एकदा ही गरीब जनता, ख्रिश्चन झाली की मग त्यांच्याकडे ढुंकुन सुद्धा बघत नाही. त्यांचा कार्यभाग साधला असतो आणि पुढील जाळे कोणावर टाकायचे? पासे टाकुन जाळ्यात अडकवायला ते सज्ज असतात.
मी त्या चेवा मुखियाला माझी असमर्थता दर्शवली. सांगितले ह्या संदर्भात तुझ्या विचारांशी जरी मी सहमत असलो तरी परदेशात मी हतबल आहे. अतिशय निराश मनाने तो परत गेला. त्याचा विषण्ण चेहरा बरंच काही बोलुन गेला…. मी मात्र मनात ख्रिश्चन समाजावर चिडलेला…. पण असहाय…

आज साईटवर बराच उशीर झाला होता. गेस्ट हाऊस ला पोचेपावेतो रात्री साडे नऊ वाजलेले. मस्तपैकी आंघोळ केली, कपडे घातले, हातात विजेरी घेतली आणि किचन रुममध्ये आलो. माझ्या पर्सनल कुक ने अन्न गरम करून वाढले, जेवत होतो तेवढ्यात गाडी थांबल्याचा आवाज आला. किचन रुममध्ये १०-१२ काळे मालावियन आणि २ गोरे आलें. त्यांना डॉक्टर रे कडून आलेला चहा , बिस्किटे सॅंडविचेस चार रतीब घालुन झालेला. आलेले मालावियन्स पिडीत चेह-याने बसलेले आणि २ गोरे कोचावर बसलेले, फेकलेल्या जाळे बरोबर अडकले ह्या समाधानकारक चेह-याने त्यांना “बाप्तिस्मा” चा विधी सांगत होते….. मी कुक कडे पाहिले, तो म्हणाला, “साहेब हे रोजचे आहे, आज फक्त तुम्ही खूप उशिरा जेवायला आले म्हणून दिसले”

भाई देवघरे

Leave a Reply