मोदींनी साधला वाराणसीतील डॉक्टरांशी संवाद

नवी दिल्ली : २१ मे – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहा:कार माजवलेला असतानाच तिसऱ्या लाटेचं संकटही घोंघावू लागलं आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाराणासी मतदारसंघातील डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळी मोदी अत्यंत भावूक झाले होते. तिसऱ्या लाट भयंकर आहे. त्यामुळे या लाटेत लहान मुलांची काळजी घेण्याचा सल्ला मोदींनी या डॉक्टरांना दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे वाराणासीतील डॉक्टरांशी संवाद साधला. कोरोना काळात तुम्ही रुग्णांची प्रचंड सेवा केली. त्याबद्दल काशीचा एक सेवक म्हणून मी तुमचा आभारी आहे. सर्व डॉक्टर आणि नर्सेस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेलं काम वाखाणण्यासारखं आहे. या व्हायरसने आपल्या जवळच्या लोकांना हिरावून नेलं आहे. त्या सर्वांना मी श्रद्धांजली अर्पण करतो, असं मोदी म्हणाले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आपल्याला एकावेळी अनेक आघाड्यांवर लढावं लागत आहे. यावेळेचा संसर्ग रेटही आधीपेक्षा अधिक आहे. रुग्णांना उपचारासाठी अधिक काळ रुग्णालयात थांबावे लागत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताणही वाढला आहे, असं मोदींनी सांगितलं. आपण वाराणासीमध्ये कोरोना रोखण्यात यश मिळवलं आहे. परंतु आता वाराणासी आणि पूर्वांचलमधील गावं वाचवण्यावर लक्ष्य केंद्रीत केलं पाहिजे. ‘जिथे बिमार, तिथेच उपचार’ हा कानमंत्र लक्षात ठेवून आता काम करावे लागणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
आपली लढाई एका अदृश्य आणि धूर्त शत्रूविरोधात आहे. सतत बदलणाऱ्या या शत्रूमुळे आपल्याला सावध राहिलं पाहिजे. लहान मुलांना वाचवणं आवश्यक आहे. त्यासाठी पावलं उचलली पाहिजेत, असं सांगताना मोदी भावूक झाले होते. यावेळी त्यांनी ब्लॅक फंगसपासून सावध राहण्याच्या सूचनाही दिल्या. या आजारापासून सावध राहून अॅक्शन घ्यायची आहे. संकटाच्या काळात काहीवेळा लोकांची नाराजीही ओढवते. मात्र, तरीही आपल्याला काम करत राहायचं आहे. त्यांचं दु:ख कमी करायचं आहे, असा सल्लाही त्यांनी दिला.

Leave a Reply