संपादकीय संवाद – विधानसभा निवडणुकांचे निकाल काँग्रेसने गांभीर्याने घेणे गरजेचे

गेले काही दिवस गाजत असलेल्या गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन प्रांतांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल अखेर आज जाहीर झालेले आहेत. अपेक्षेनुसार भाजप पुन्हा एकदा सत्तेत आली आहे. मात्र यावेळी भाजपने काँग्रेसचे पुरते पानदान वाजवले दिसते. एकेकाळी गुजरातवर निरंकुश सत्ता राबवणाऱ्या काँग्रेसला आज फक्त २० जागांवर समाधान मानावे लागते आहे.
यापूर्वी २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत देखील भाजपचं विजयी झाला होता, मात्र काँग्रेसची अवस्था इतकी दयनीय नव्हती, यावेळी भाजपने गुजरातेत स्वतःचा १२७ जागांचा रेकॉर्ड तर मोडलाच पण त्याचबरोबर काँग्रेसचा १४९ जागांचा रेकॉर्डही मोडलेला दिसतो आहे.
यावेळी प्रथमच आम आदमी पार्टी गुजरातमध्ये पूर्ण ताकदीने उतरली होती, आम आदमी पार्टीने काँग्रेसची मते फोडली, असा राजकीय विश्लेषकांचा दावा आहे, आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी आम्हीच सत्तेत येणार असे पत्रकारांना लिहून दिले होते, मात्र त्यांना जेमतेम ५ जागा मिळाल्या, असे असले तरी त्यांची मतांची टक्केवारी लक्षणीय राहिली आहे. ही टक्केवारी लक्षात घेता त्यांना राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही त्यांच्याकरिता महत्वपूर्ण उपलब्धी म्हणावी लागेल.
गुजरातच्या निवडणुकांना राष्ट्रीय स्तरावर एक वेगळे महत्व आहे, स्वातंत्र्यानंतर देशात सर्वत्र काँग्रेसची सत्ता होती. परिणामी काँग्रेसच्या नेत्यांची दादागिरी तर वाढली होतीच पण भ्रष्टाचारानेही कहर केला होता, त्याला सर्वप्रथम आव्हान दिले ते गुजरातेतील तरुणाईने. त्यावेळी तरुणाईने आमदारांच्या घरोघरी जाऊन त्यांना गाढवावर बसवून मिरवले आणि राजीनामे द्यायला भाग पाडले होते, परिणामी तत्कालीन केंद्र सरकारने तिथले सरकार बरखास्त करून तिथे फेरनिवडणुका घेतल्या होत्या आणि प्रथमच तिथे गैरकाँग्रेसी सरकार आले होते. तेव्हापासून गुजरात हा परिवर्तनवादी प्रांत म्हणूनच ओळखला गेला आहे. गेली २७ वर्ष गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाची सलग सत्ता राहिली आहे. त्यामुळे यावेळी परिवर्तन होणार असे अंदाज बांधले जात होते, मात्र ते खोटे ठरवत पुन्हा भारतीय जनता पक्षाने बाजी मारली आहे. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असतांना २००२ साली गुजरातमध्ये हिंदू मुसलमानांच्या दंगली झाल्या, मोदींना काँग्रेसने मौत का सौदागर म्हणून हिणवले मात्र मतदारांवर त्याचा परिणाम झाला नाही दरवेळी मोदीच विजयी होत गेले, मोदी केंद्रात गेल्यावर त्यांनी दिलेला मुख्यमंत्री स्वीकारत जनतेने भाजपलाच विजयी केले. आजही ती परंपरा कायम राहिली आहे.
या निकालाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने कठोर आत्मपरीक्षण करणे गरजेचे झाले आहे. काँग्रेसचे एक आधारस्तंभ म्हणून ओळखले जाणारे महात्मा गांधी यांनी आपल्या आयुष्यातील दीर्घकाळ गुजरातेतच काढला होता, आजही गुजरातेत साबरमतीला गांधीजींचा आश्रम उभा आहे. त्यामुळे गुजरातवर गांधी विचारांचा मोठा पगडा असल्याचे बोलले जाते. तरीही सलग २७ वर्ष भाजप तिथे सत्तेत राहतो आणि पुन्हा नव्याने सातव्या वेळी पुन्हा सत्तेत येतो त्याचवेळी काँग्रेसची पुरती नाचक्की करतो याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. हा विचार आजच व्हायला हवा, उद्या उशीर झालेला असेल. काँग्रेसजनांनी ही बाब गांभीर्याने घ्यायला हवी इतकेच इथे सुचवावेसे वाटते.

अविनाश पाठक

Leave a Reply