परोपकार करण्यातही गौतम अडाणी अव्वल

नवी दिल्ली : ६ डिसेम्बर – फोर्ब्सची आशियातील हिरोज ऑफ फिलान्थ्रॉपी यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये भारतीय अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी, शिव नाडर आणि अशोक सूता तसेच मलेशियन-भारतीय उद्योगपती ब्रह्मल वासुदेवन आणि त्यांची वकील पत्नी शांती कंडिया यांचा समावेश करण्यात आला आहे. या यादीमध्ये कोणत्याही क्रमवारीशिवाय, आशिया-पॅसिफिक प्रदेशात अग्रगण्य परोपकारी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा समावेश असल्याचे फोर्ब्सने जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.
अदानींनी या वर्षी जूनमध्ये 60 वर्षांचे झाल्यावर धर्मादाय कारणांसाठी 60,000 कोटी रुपये ($7.7 अब्ज) खर्च करण्याचे वचन दिले आहे. यानंतर त्यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. अदानींकडून जाहीर करण्यात आलेली ही रक्कम आरोग्यसेवा, शिक्षण आणि कौशल्य विकासावर खर्च केली जाणार असून, ही रक्कम अदानी फाऊंडेशनच्या माध्यमातून सेवाभावी कामांसाठी खर्च करण्यात येणार आहे. अदानी फाउंडेशनची स्थापना 1996 मध्ये झाली. दरवर्षी हे फाउंडेशन भारतातील 37 लाख लोकांना मदत करते.
तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज अशोक सूता यांनी वैद्यकीय संशोधनासाठी एका ट्रस्टला 600 कोटी देण्याचे वचन दिले आहे. 2021 मध्ये त्यांनी या ट्रस्टची स्थापना केली आहे. याशिवाय मलेशियन-भारतीय ब्रह्मल वासुदेवन, क्वालालंपूरस्थित प्रायव्हेट इक्विटी फर्म क्रेडॉरचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांची वकील पत्नी शांती कंडिया क्रेडॉर फाउंडेशनच्या माध्यमातून मलेशिया आणि भारतातील स्थानिक समुदायांना मदत करण्याचे कार्य करतात. या संस्थेची स्थापना 2018 मध्ये सह-स्थापित झाली होती. या वर्षी मे मध्ये त्यांनी शिक्षण, रुग्णालय बांधण्यासाठी 50 दशलक्ष मलेशियन रिंगिट म्हणजेच 11 दशलक्ष डॉलर देण्याचे वचन दिले आहे.
अब्जाधीश असलेल्या शिव नाडर यांची गणना देशातील आघाडीच्या देणगीदारांमध्ये केली जाते. शिव नादर फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी एका दशकात धर्मादाय कार्यात एक अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. या वर्षी त्यांनी 11,600 कोटी रुपये फाउंडेशनला दान केले आहेत. नाडर हे एचसीएल टेक्नॉलॉजीजचे सह-संस्थापक असून, शिव नदार फाउंडेशनच्या मदतीने त्यांनी शाळा, विद्यापीठे अशा अनेक शैक्षणिक संस्था स्थापन केल्या आहेत.

Leave a Reply