अल्पवयीन मुलींकडून देहव्यापार करवून घेणाऱ्या महिलेला अटक

नागपूर : ६ डिसेम्बर – स्वत:च्या मुलीला चांगल्या शाळेत घालून शिक्षण द्यावे आणि मुलीच्या शिक्षणाचा खर्च भागावा, यासाठी एका महिलेने आर्थिक परिस्थितीने पिचलेल्या कुटुंबातील नवव्या वर्गात शिकत असलेल्या मुलीच्या शरीराचा सौदा करून आलेल्या रकमेतून स्वत:च्या मुलीचे भविष्य घडवण्याचे नियोजन केेले. मात्र, गुन्हे शाखेने त्या महिलेच्या घरात सुरू असलेल्या देहव्यापारावर छापा घालून तिला अटक केली. पिंकी (रा. जैन रेसिडेंट अपार्टमेंट, कोराडी) असे आरोपी महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोराडीत राहणारी १५ वर्षीय स्विटी (काल्पनिक नाव) हिच्या वडिलाचे निधन झाले तर आई धुणीभांडी करते. स्विटी नवव्या वर्गाची विद्यार्थिनी असून ती अभ्यासात हुशार आहे. घरची आर्थिक स्थिती योग्य नसल्यामुळे शाळेचे शुल्क भरू शकली नाही. त्यामुळे तिच्यावर शिक्षण सोडण्याची वेळ आली. तिच्या घराशेजारी राहणारी पूजा (२८) हिने तिच्याशी गोडीगुलाबीने बोलून घरी आणले. तिला शाळेचे शुल्क भरण्याची तयारी दाखवत त्या बदल्यात देहव्यापाराची अट ठेवली. शिक्षणाची गोडी असलेल्या स्विटीने तयारी दर्शवली. तिने पती अमोल आणि मैत्रीण पिंकीच्या माध्यमातून स्विटीला देहव्यापारात ढकलले. तिला काही नवीन कपडे, शालेय गणवेश आणि पुस्तके घेऊन दिले व या उपकाराच्या ओझ्याखाली स्विटीला रोजच ग्राहकांच्या स्वाधीन करण्यात येत होते.
पिंकी आणि पूजा या दोघी अल्पवयीन मुलीकडून देहव्यापार करवून घेत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या प्रमुख पोलीस निरीक्षक शुभांगी वानखेडे यांना मिळाली. त्यांनी शहानिशा करून रविवारी दुुपारी बनावट ग्राहक पाठवला. त्या ग्राहकाशी पिंकी आणि पूजाने सौदा केला. त्यानंतर अमोल याने स्विटीला दुचाकीवर बसवून ग्राहकाच्या खोलीत पाठवले. बनावट ग्राहकाने पोलिसांना इशारा केला. पोलिसांनी सदनिकेत छापा घालून पिंकीला अटक केली. अमोल आणि पूजा यांनी पळ काढला.

Leave a Reply