महाराष्ट्रातील जनतेच्या सहनशक्तीचा कोणी अंत पाहू नये – उदय सामंत

मुंबई : ६ डिसेंबर – महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सध्या पेटला असतानाच बेळगावमध्ये महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक कऱण्यात आली आहे. बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. एकूण सहा ट्रकवर शाईफेक आणि दगडफेक करत तोडफोड करण्यात आली आहे. शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांचा बेळगाव दौरा रद्द झालेला असल्याने महाराष्ट्रात राजकीय वाद पेटला असतानाच, दगडफेकीमुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. यावर शिंदे गटाचे उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक झाली असेल तर ही निषेधार्ह बाब आहे. मी याचा जाहीर निषेध करतो. सीमावाद सुप्रीम कोर्टात असून, प्रत्येक राज्याने आपली बाजू भक्कमपणे मांडली पाहिजे. हीच भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतली आहे. असं असताना महाराष्ट्रातील जनतेच्या सहनशक्तीचा कोणी अंत पाहू नये अशी माझी विनंती आहे,” असं उदय सामंत म्हणाले आहेत.
पुढे ते म्हणाले की “कर्नाटक सरकारने यामध्ये तातडीने लक्ष घातलं पाहिजे. हल्ला करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी. आपण एका देशात राहत असून, सीमावाद सुप्रीम कोर्टात आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारने सुप्रीम कोर्टाचा निर्णय मान्य असेल अशी भूमिका घेतली पाहिजे. पण गेल्या काही दिवसांपासून जे उकसवायचं काम सुरु आहे ते बंद केलं पाहिजे. तसंच संबंधितांवर कडक कारवाई करावी. यासंबंधी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील”.
“महाराष्ट्राला आक्रमकता काय असते हे चांगलंच माहिती आहे. आक्रमकता काय असते याचे धडे दुसऱ्या राज्यातून घेण्याची गरज नाही. पण एकाच देशात राहत असल्याने सरकार आणि जनता संयम पाळत आहे. यामुळेच कर्नाटक सरकारने हस्तक्षेप करत अशा प्रवृत्तींना रोखलं पाहिजे यासाठी विनंती केली आहे,” असं उदय सामंत यांनी सांगितलं.

Leave a Reply