वंचितला महाविकास आघाडीत समाविष्ट करुन घेण्यासाठी आम्ही सकारात्मक – अजित पवार

मुंबई : ६ डिसेंबर – आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना-वंचित आघाडी यांच्या युतीबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांची सोमवारी भेट होऊन चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक झाली असून, वंचित महाविकास आघाडीत सहभागी होईल, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. दरम्यान, वंचितला महाविकास आघाडीत समाविष्ट करुन घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांच्या संमतीचीही आवश्यकता आहे. यादरम्यान विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
अजित पवार यांनी वंचितला महाविकास आघाडीत समाविष्ट करुन घेण्यासाठी आपण सकारात्मक असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आता नवं राजकीय समीकरण पाहायला मिळू शकतं.
जे समविचारी पक्ष येतील त्यांना सोबत घेण्याची महाविकास आघाडीची तयारी आहे. उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि भाई जगताप यांना विचारणा केली. तसंच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मी आणि छगन भुजबळ यांच्याशी चर्चा केली आहे. आम्ही सकारात्मक भूमिका घेतली आहे. आम्ही याबाबत सकारात्मक आहोत,” असं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.
उद्धव ठाकरे-प्रकाश आंबेडकर भेट
वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी या आधीच शिवसेनेबरोबर युती करण्याची वंचित आघाडीची तयारी असून, त्याबाबत प्रकाश आंबेडकर व शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांच्यात दोन बैठक होऊन सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर सोमवारी उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर यांच्यात बैठक झाल्याने युतीच्या चर्चेला आणखी वेग आल्याचे मानले जाते. ग्रॅंड हयात हॉटेलमध्ये या दोन नेत्यांची बैठक झाल्याची माहिती शिवसेनेतील सूत्राकडून देण्यात आली.

Leave a Reply