वर्धा मार्गावरील ‘डबल डेकर’ पुलाची गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

नागपूर : ४ डिसेंबर – अनेक मैलाचे दगड पार करणाऱ्या मेट्रो प्रकल्पातील वर्धा मार्गावरील डबल डेकर पूलाची प्रतिष्ठेच्या गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली. त्यामुळे संत्रानगरीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या डबल डेकर पुलाची यापूर्वीच आशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
महामेट्रोच्या वर्धा रोडवरील डबल डेकर व्हाया-डक्टची संपूर्ण जगात मेट्रो श्रेणीतील सर्वात लांब डबल डेकर म्हणून गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. येत्या सहा डिसेंबरला मेट्रो भवन येथे आयोजित कार्यक्रमात महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित यांना गिनिज वर्ल्ड रेकॉर्डतर्फे प्रमाणपत्र प्रदान केले जाणार आहे. लंडन येथे मुख्यालय असलेल्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे कार्यकारी अधिकारी ऋषी नाथ डॉ. दीक्षित यांना प्रमाणपत्र प्रदान करतील.
महामेट्रोने गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदीसाठी अर्ज केला होता. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डच्या भारतातील प्रतिनिधींनी याबाबत सतत पाठपुरावा केला. त्यांनी आपल्या पथकासोबत अभ्यास केला. त्यानंतर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने महामेट्रो चा दावा मान्य करत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड देण्याची घोषणा केली.

Leave a Reply