हर हर महादेव हा सिनेमा टीव्हीवर प्रदर्शित होऊ देणार नाही – छत्रपती संभाजीराजे

मुंबई : ४ डिसेंबर – हर हर महादेव सिनेमाचा वाद पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे. हर हर महादेव हा सिनेमा थिएटर मध्ये बंद पडल्यानंतर आता 18 डिसेंबर रोजी झी मराठी या वाहिनीवरून टीव्हीवर प्रदर्शित केला जाणार आहे. मात्र हा सिनेमा टीव्हीवर प्रदर्शित होऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा छत्रपती संभाजीराजे व स्वराज्य संघटनेनं घेतला आहे. हर हर महादेव हा वादग्रस्त सिनेमा टिव्हीवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना झी स्टुडिओ जबाबदार असेल, असं छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. इतिहासाचे चुकीच्या पद्धतीने सादरीकरण करण्यात आलेला व तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावणारा हा सिनेमा टिव्हीवर प्रदर्शित करू नये, याबाबत स्वराज्य संघटनेने झी स्टुडीओला पत्र लिहून सूचित केलं आहे. या सूचनेकडे कानाडोळा करून हर हर महादेव सिनेमा टिव्हीवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना झी स्टुडिओ जबाबदार असेल, असा इशारा देण्यात आला आहे.
संभाजीराजे छत्रपतींनी झी स्टुडिओला पत्र लिहून इशारा दिला आहे. पत्रात लिहिण्यात आलं आहे की, ‘हर हर महादेव या सिनेमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत चुकीच्या पद्धतीनं सादरिकरण झााले असल्यानं या सिनेमाबाबत संपूर्ण महाराष्ट्रातून संतापाची लाट उसळली होती. राज्यात अनेक ठिकाणी या सिनेमाचे प्रदर्शन बंद पाडण्यात आले होते’.
पत्रात पुढे म्हटलं, ‘या सिनेमामुळे तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावल्या गेलेल्या असताना देखील हा वादग्रस्तसिनेमा तुम्ही झी मराठी वाहिनीच्या माध्यमातून टेलिव्हिजनवर प्रदर्शित करीत आहात. शिवभक्तांच्या भावनांशी असा खेळ करणे योग्य नाही. सदरील सिनेमा टेलिव्हिजनवर प्रदर्शित करू नये, असं स्वराज्य संघटना सूचित करीत आहे. या सूचनेकडे कानाडोळा करून हर हर महादेव हा सिनेमा टेलिव्हिजनवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणांमांना समोरे जावे लागेल व त्यासाठी पूर्णत: तुम्ही जबाबदार असाल’.
संभाजीराजे छत्रपती आणि स्वराज्य संघटनेकडून देण्यात आलेल्या या इशाऱ्यानंतर येत्या18 डिसेंबरला हर हर महादेव हा सिनेमा झी मराठीवर दाखवण्यात येणार का? सिनेमाचे निर्माते आणि झी स्टुडिओ यावर काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
हर हर महादेव सिनेमात अभिनेता सुबोध भावे शिवाजी महाराजांच्या प्रमुख भूमिकेत आहे. तर अभिनेता शरद केळकर यांनी बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारली आहे. तसंच अभिनेत्री सायली संजीव, अमृता खानविलकर, हार्दीक जोशी, नितीश चव्हाण सारखे अनेक कलाकार आहेत.

Leave a Reply