मला विश्वास आहे, दिव्यांग मंत्रालयाचा पहिला मंत्री बच्चू कडूच असेल – बच्चू कडू

अमरावती : ३० नोव्हेंबर – शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर अपक्ष आमदारांमधील सर्वात पहिल्यांदा पाठींबा देणारे अपक्ष आमदार बच्चु कडू हे शिंदे सरकारवर नाराज असल्याचे बोलले जात होते. दरम्यान याबाबत कडू यांनी वारंवार नाराजी जाहीर बोलून दाखवलं होतं. दरम्यान बच्चू कडू यांच्या काही मागण्या सरकारपुढे होत्या त्याती महत्वाची दिव्यांगांसाठी स्वतंत्र्य मंत्रालय हा मुद्दा त्यांनी कायम लावून धरला होता. या निर्णयानंतर बच्चू कडू आनंदी झाले आहे. म्हणून त्यांनी माध्यमांना मंत्रीपदाबाबत मोठी माहिती दिली आहे.
काल अमरावती दौऱ्यावर असताना बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाल की, राज्यात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाला मंजुरी देण्यात आली आहे. हे देशातील अशा प्रकारचे पहिलेच मंत्रालय आहे. आपण कुणासाठी काम केलं पाहिजे? असा एक मोठा संदेश देशात गेला आहे.
आम्ही नेहमी म्हणायचो की, अर्थसंकल्पाचे पहिले पान ज्यादिवशी दिव्यांगासाठी, विधवा महिलांसाठी, शेतकरी, मजुरांसाठी आणि वंचितासाठी लिहिल जाईल, तेव्हा देशाचे बजेट सर्वात सुंदर असेल. असा अर्थसंकल्प देशाला सक्षम करणारा असेल असे ते म्हणाले.
यानंतर माध्यमांनी त्यांना मंत्रीपदाबाबत विचारले असता मला वाटतं की, मला मंत्रिपद न मिळाल्याचं दु:ख आता मी विसरून गेलो आहे. नवीन सुखाची पाऊलवाट आता सुरू झाली आहे. दिव्यांग मंत्रालयाला मंजुरी मिळाली आहे. मला आत्मविश्वास आहे की, दिव्यांग मंत्रालयाचा पहिला मंत्रीही बच्चू कडूच असेल असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला.
तसेच मंत्रिपद वगैरे चुलीत घाला. तुम्ही शेवटी त्याच मुद्द्यावर येता. माझ्यासाठी मंत्रिपद फार महत्त्वाचं नाही. मंत्री तर मी होणारचं आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी मला शब्द दिला आहे. त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्र्यांनीही सांगितलं आहे. माझा महत्वाचा मुद्दा दिव्यांगाच्या शेवटच्या घरापर्यंत सेवा देण्याचा आहे. हे मंत्रालय केवळ मंत्रालयापुरतं मर्यादीत राहणार नाही. दिव्यांगाच्या उंबरठ्यावर जाऊन त्याला सेवा देण्याचं काम आम्ही करणार असल्याचे बच्चु कडू म्हणाले.

Leave a Reply