गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ३० नोव्हेंबर – “अनेक शिवभक्त, तसेच मावळ्यांची एक भावना होती. या गडावर असलेले अतिक्रमण दूर झाले पाहिजे, असे मत प्रत्येकाचे होते. कायद्याने, नियमाने काम करण्याचे धाडस काही लोक दाखवत नव्हते. मात्र छत्रपतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आता आपले सरकार स्थापन झाले आहे. आपल्या प्रत्येक मंत्रीमंडळ बैठकीत लोकहिताचे निर्णय घेण्यात येतात. न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रतापगडावरील अतिक्रमण काढून टाकण्याची कारवाई करण्यात आली. शिवाजी महाराजांचा इतिहास कोणालाही पुसता येणार नाही. शिवरायांची साक्ष देणारा प्रत्येक विषय राज्य सरकार पुढे नेल्याशिवाय राहणार नाही,” अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली.
“३६३ वर्षांपूर्वी अफझलखानाने महाराष्ट्रावर चालून येण्याचे धाडस केले. खानाने वार केल्यानंतर महाराजांनी त्याच्यावर प्रतिवार करून त्याचा कोथळा बाहेर काढला. शिवाजी महाराजांकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. फक्त शिवाजी महाराजांचे नाव घेऊन आपल्याला शांत बसता येणार नाही. तर त्यांच्या शिकवणीप्रमाणे आपल्याला महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्याचे काम करावे लागेल,” अशा भावना शिंदे यांनी व्यक्त केल्या.
दरम्यान, प्रतापगडावरील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. “गड-किल्ल्यांवरील सर्व अतिक्रमणं आगामी काळात काढण्यात येतील. निधीची कोठेही कमतरता भासणार नाही. गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्यात येईल. शिवरायांचा इतिहास आपल्याला प्रेरणा देणारा आहे. त्यामुळे या गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करण्यात येईल. या प्राधिकरणांतर्गत गड-किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम केले जाईल”, अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे. प्रतापगडावर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले, मंत्री शंभुराज देसाई यांच्यासह इतर नेत्यांची उपस्थिती होती.

Leave a Reply