शिवसेना पक्ष व चिन्हांबाबत पहिली सुनावणी होणार १२ डिसेम्बरला

मुंबई : २९ नोव्हेंबर – मोठी बातमी समोर येत आहे. आता लवकरच शिवसेना पक्षाचा हक्क आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सुनावणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग येत्या 12 डिसेंबरला याबाबत पहिली सुनावणी घेणार आहे. आयोगाने आजच्या आदेशात 12 डिसेंबरला पहिली सुनावणी होईल असं म्हटलं आहे. 23 नोव्हेंबरपर्यंत ठाकरे आणि शिंदे अशा दोन्ही गटांनी आपली कागदपत्रे सादर करावीत असे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानंतर आज आयोगाकडून सुनावणीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. आयोगाच्या नव्या आदेशानुसार दोन्ही गटांना येत्या 9 डिसेंबरपर्यंत अतिरिक्त कागदपत्रे आयोगाकडे सादर करता येणार आहेत. त्यानंतर 12 डिसेंबरला यावर निवडणूक आयोग पहिली सुनावणी घेणार आहेत. त्यामुळे शिवसेना नेमकी कोणाची याचा फैसला आता लवकरच होण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे यांनी उठाव केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. शिवसेनेचे अनेक आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या मदतीनं मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर आमचीच शिवसेना खरी आहे असा दावा त्यांनी केला. त्यानंतर दोन्ही गटाकडून पक्षाचं नाव आणि चिन्हावर दावा करण्यात आला. दोन्ही गटाने चिन्ह आणि नावावर दावा केल्यामुळे निवडणूक आयोगाकडून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आलं आहे. त्यानंतर दोन्ही गटाला निवडणूक आयोगाकडून नव्या चिन्हाचं वाटप करण्यात आलं.
दरम्यान आता या प्रकरणाची पहिली सुनावणी केंद्रीय निवडणूक आयोग 12 डिसेंबरला घेणार आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले होते, त्यानुसार दोन्ही गटाकडून निवडणूक आयोगाकडे कागदपत्र सादर करण्यात आले आहेत. आयोगाच्या नव्या आदेशानुसार दोन्ही गटांना येत्या 9 डिसेंबरपर्यंत अतिरिक्त कागदपत्रे आयोगाकडे सादर करता येणार आहेत. त्यानंतर 12 डिसेंबरला पहिली सुनावणी पार पडणार आहे.

Leave a Reply