केंद्रीय तपास संस्थेचे अधिकारी असल्याचे सांगून केली १४ लाखांची लूट

नागपूर : २८ नोव्हेंबर – केंद्रीय तपास संस्थेचे अधिकारी असल्याचे सांगून पोलिसांनी दोन किलो सोने सोडण्याच्या मोबदल्यात १४ लाख रुपये उकळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या वृत्ताने सराफा व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गोपनीय चौकशी सुरू केल्याची माहिती आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इतवारीतील एका सराफाने कर्मचाऱ्याच्या माध्यमातून कोलकाता येथून दोन किलो सोने बोलाविले. कर्मचारी सोने घेऊन दुकानात जात असताना चार ते पाच जणांनी त्याला अडविले. ‘आम्ही केंद्रीय तपास संस्थेचे अधिकारी आहोत’, असे सांगून ते कर्मचाऱ्याला पोलिस स्टेशनमध्ये घेऊन गेले.
दरम्यान, कर्मचारी न परतल्याने सराफाने त्याच्या मोबाइलवर संपर्क साधला. मात्र, संपर्क झाला नाही. याचदरम्यान एका व्यापाऱ्याने सराफाशी संपर्क साधून केंद्रीय तपास संस्थेच्या अधिकाऱ्यांनी सोने पकडल्याचे सांगितले. सोनेखरेदीचे दस्तऐवज नसल्याने तो सराफा घाबरला. पकडल्या जाण्याची भीती त्याला होती. प्रकरण मिटविण्यासाठी सराफाने व्यापाऱ्याला १४ लाखांची मागणी केली. सराफाने त्याला १४ लाख रुपये दिले. त्यानंतर काही वेळाने कर्मचारी सोने घेऊन दुकानात आला. कर्मचाऱ्याने सराफाला घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी पकडल्याचेही त्याने सांगितले. केंद्रीय तपास पथकाचा धाक दाखवून पैसे उकळण्यात आल्याचे सराफाच्या लक्षात आहे. हे वृत्त वाऱ्यासारखे इतवारीत पसरले. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनाही याची माहिती मिळाली. अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले. मध्यस्थी करणारा व्यापारी कुख्यात असल्याचे बोलले जाते.

Leave a Reply