आरोपीने पळून जाण्याच्या उद्देशाने घडवला पोलीस व्हॅनचा अपघात, ७ पोलीस कर्मचारी जखमी

बीड : २८ नोव्हेंबर – बीड जिल्ह्यातून दोन दिवसांपूर्वीच एक धक्कादायक घटना समोर आली होती. यात शेतीच्या जुन्या वादातून पुतण्यानेच वयोवृद्ध चुलता, चुलतीवर कोयत्याने हल्लाकेला. यात चुलत्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान पोलीस या प्रकरणातील आरोपीला पकडून घेऊन जात असताना आरोपीने भलताच प्रताप केला. आरोपीने चालत्या पोलीस व्हॅनमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला आहे.
चालत्या व्हॅनमधून पळून जाण्यासाठी आरोपीने पोलीस व्हॅनच्या स्टेअरिंगला झटका दिला. यामुळे पोलीस व्हॅन पलटली. या घटनेत पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख गंभीर जखमी झाले आहेत. आरोपी रोहिदास विठ्ठल निर्मळ याला घटनास्थळी घेऊन जाताना पाटोदा – मांजरसुंबा महामार्गावरील जाधववस्ती येथे ही घटना घडली. जखमी मुस्तफा शेख यांच्यावर बीड शहरातील लोटस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेत पोलीस अधिकाऱ्यासह सात गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
या आरोपीने शेतीच्या जुन्या वादातून वयोवृद्ध चुलता, चुलतीवर कोयत्याने हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये हे वृद्ध दाम्पत्य गंभीर जखमी झाले. या घटनेत जखमी झालेल्या वृद्धाचा मृत्यू झाला, तर महिलेवर उपचार सुरू आहेत. बीड तालुक्यातील मुळुकवाडी येथे ही घटना घडली . बळीराम मसाजी निर्मळ वय 80 वर्ष आणि केसरबाई बळिराम निर्मळ वय 70 वर्ष असं या दाम्पत्याचं नाव आहे.

Leave a Reply