तुम्ही तर खोटारड्यांचे सरदार आहात – मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

नवी दिल्ली : २८ नोव्हेंबर – गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण आलं आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शाब्दिक प्रहार केला आहे. “गरिबीवर बोलून पंतप्रधान मोदी सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, लोक आता हुशार झाले आहेत, ते मुर्ख नाहीत. तुम्ही अजुन किती वेळा खोटं बोलणार आहात? तुम्ही तर खोटारड्यांचे सरदार आहात. हेच लोक काँग्रेस देशाला लुटत असल्याचा आरोप करतात”, अशी टीका गुजरातमधील एका प्रचारसभेत खरगेंनी केली आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने गरीब असल्याचं सांगतात. आम्ही तर गरिबांपेक्षा गरीब आहोत. मी तर अस्पृश्यांमध्ये मोडतो. कमीतकमी तुमच्या हाताने कोणी चहा तरी पितं, पण माझ्याकडून कोणी चहादेखील घेत नाही”, अशी खंत खरगेंनी यावेळी बोलून दाखवली. “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह सातत्याने विचारतात, ७० वर्षांत काँग्रेसनं काय केलं. जर आम्ही ७० वर्षांमध्ये काहीच केलं नसतं, तर तुम्हाला लोकशाही दिसली नसती”, असं टीकास्र खरगेंनी भाजपावर सोडलं आहे.
दरम्यान, सुरतमधील सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला ‘दहशवाद्यांचे हितचिंतक’ असं म्हटलं आहे. “गुजरातच्या नव्या पिढीने अहमदाबाद आणि सुरतचे साखळी बॉम्बस्फोट पाहिलेले नाहीत. जे दहशतवाद्यांचे हितचिंतक आहेत, त्यांच्याबद्दल मी त्यांना सावध करू इच्छितो”, असे मोदी म्हणाले आहेत. “बाटला हाऊस चकमकीदरम्यान रडारड करत काँग्रेस नेते दहशवाद्यांचे समर्थन करत होते. दहशतवाद काँग्रेससाठी वोट बँक आहे. आता केवळ काँग्रेसच नाही, तर अनेक असे पक्ष उदयास आले आहेत, जे शॉर्टकट आणि तुष्टीकरणावर विश्वास ठेवतात”, अशी टीका मोदींनी केली आहे.

Leave a Reply