६५ वर्षीय दिव्यांग महिलेवर बलात्कार करून केली हत्या, युवक अटकेत

अमरावती : २७ नोव्हेंबर – संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांडासारखी एक थरारक घटना अमरावती जिल्ह्यातील पथ्रोड येथे घडली आहे. या घटनेत एका ६५ वर्षीय अपंग महिलेवर एका ३२ वर्षीय तरुणाने नशेत बलात्कार करून तिची हत्या केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पथ्रोड येथे ही महिला राहत होती. या महिलेवर अत्याचार केल्यानंतर तिचा मृतदेह एका मोठ्या कापडमध्ये गुंडाळून ठेवत आरोपीने गावभर स्वतःच केलेल्या कुकर्माची ग्वाही देत फिरत असल्याची माहिती पुढे आली आहे.
या प्रकरणात मृत महिलेच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून तांबटकर पुरा पथ्रोड येथील आरोपी विशाल जगन्नाथ नांदुरकर (वय ३२) याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्या विरुद्ध कलम ३७६ आणि ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ व अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव यांनी घटनास्थळी भेट दिली. तर कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस बंदोबस्तात वाढ केली आहे.
घटनेनंतर आरोपी दारूच्या नशेत सायंकाळी पोलीस ठाण्याकडे फिरत असताना अनावश्यक बडबड करू लागला. या बडबडीत “माझ्या घरात ती महिला पाय घसरून पडली अन् मेली” असंही तो बोलून गेला. पोलिसांनी लगेच त्याला थांबवून त्याची चौकशी केली. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपीच्या घरी जाऊन शोध घेतला. तेव्हा त्यांना ती महिला दिसली नाही मात्र घरातील गादी खाली पडलेली दिसली. पोलीस कर्मचाऱ्यांनी ती गादी सरकवून बघताच महिलेचा मृतदेह आढळला आणि लागलीच पोलिसांची धावपळ सुरू झाली.
आरोपीने त्या अपंग महिलेचा एका कापडाने गळा घोटला असून यातच ती ठार झाल्याची सूत्रांची माहिती आहे. पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असला तरी त्यांना शवविच्छेदन अहवालासह वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे. या वैद्यकीय अहवालातूनच काही महत्त्वपूर्ण बाबींचा उलगडा होणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान, न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave a Reply