एचआयव्ही बाधित गर्भवती महिलेवर उपचार करण्यास नकार, महिलेने गमावले आपले बाळ

आग्रा : २३ नोव्हेंबर – उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एचआयव्ही बाधित गर्भवती महिलेवर उपचार करण्यास नकार दिल्याचा प्रकार समोर आला आहे. उपचारांस विलंब झाल्यानं या महिलेने आपलं बाळ गमावलं आहे, असा आरोप महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे.
महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर तिला कुटुंबीयांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिथे गेल्यानंतर कर्मचाऱ्यांनी तिच्यावर उपचार करण्यास नकार दिला. जवळपास सहा तास ती रुग्णालयातच स्ट्रेचरवरच होती. मात्र, तरीही तिच्यावर उपचार करण्यासाठी कोणीही डॉक्टर आले नाहीत, अशी तक्रार तिच्या कुटुंबीयांनी केली आहे. या प्रकरणी महिलेच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली असून चौकशी करण्याचे आदेश फिरोजाबाद मेडिकल महाविद्यालयाच्या प्राचार्यानी दिले आहेत.
महिलेचे वडिल हे बांगड्या बनवण्याच्या कारखान्यात काम करतात. ते म्हणाले की, एका खासगी रुग्णालयात प्रसूतीसाठी २० हजार रुपये मागितले होते. नंतर नास्कॉच्या अधिकाऱ्यांसोबत सल्लामसलत केल्यानंतर आम्ही तिला मेडिकल महाविद्यालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. रविवारी दुपारी २.५० वाजता आम्ही तिला रुग्णालयात दाखल केले. माझी मुलगी सहा तासांपासून स्ट्रेचरवरच होती. तिला असह्य वेदना होत होत्या. आम्ही कित्येकवेळा विनंती करुनही एकही डॉक्टर तिला तपासण्यासाठी पुढे आला नाही, असं महिलेच्या वडिलांनी म्हटलं आहे.
काही वेळानंतर महिलेचा त्रास अधिक वाढू लागला. सहा तास उलटून गेल्यानंतरही कोणीही तिला बघायला आलं नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार गेल्यानंतर एक नर्स माझ्या लेकीला घेऊन प्रसूत कक्षात घेऊन गेली. त्यानंतर काही वेळानं तिने एका मुलाला जन्म दिला. मात्र, मुलाला श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला मृत्यू झाल्याचं आम्हाला सांगण्यात आलं, असं तिच्या वडिलांनी म्हटलं आहे. तसंच, रुग्णालयाकडून हलगर्जीपणा करण्यात आला तरीदेखील ते हात झटकत आहेत. तसंच, आमचा काहीही दोष नसल्याचं म्हटलं माझ्यावर पत्रावर सही करण्यासाठी दबाव टाकत आहेत, अशी तक्रार त्यांनी केली आहे.
महिलेचे कुटुंबीयांना खासगी रुग्णालयातील उपचार परवडणारे नव्हते. म्हणूनच मी त्यांना मेडिकल कॉलेजमध्ये जाण्यास सांगितले. मात्र, रुग्णालयाचा एकही कर्मचारी वा डॉक्टर तिच्यावर उपचार करण्यास तयार नव्हता. वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी तिच्यावर उपचार करण्यास तयारी दर्शवली मात्र तोपर्यंत उशीर झाला होता, असं नॅस्कोचे अधिकारी सरीता यादव यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, ही महिला आपल्या आई-वडिलांच्या घरी राहते. लग्नाच्या एक वर्षानंतरचती आपल्या पतीपासून वेगळी झाली. तिला पतीपासूनच एचआयव्ही झाल्याचा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

Leave a Reply