पत्नीच्या इच्छेविरुद्ध अत्याचार करणाऱ्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

अकोला : २२ नोव्हेंबर – पत्नीच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर बळजबरी करत अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या नराधम पतीविरुद्ध अकोला न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करण्यासह अटक करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणात पती-पत्नीतील आपआपसातील भांडण असल्याचं सांगत पोलिसांनी हा वाद आपआपसात मिटवण्याचा सल्ला दिला होता. महेश असं या डॉक्टरचं नाव असल्याचं सांगण्यात आलं आहे.
अकोला शहरातील खदान परिसरात राहणाऱ्या एका डॉक्टर पत्नीने, माझा पती मला दररोज मारहाण करून अश्लील शिवीगाळ करतो. तसेच अनैसर्गिक कृत्य करत नराधमाप्रमाणे मला वागणूक देतोय, अशी तक्रार खदान पोलीस स्टेशनला दिली होती. पती-पत्नीतील भांडण असल्याचं सांगत पोलिसांनी हा वाद आपआपसात मिटवण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर सदर पीडित पत्नीने पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन त्यांच्याकडेही तक्रार केली होती. मात्र, नंतर पीडित पत्नीने याप्रकरणी न्यायालयाचे दार ठोठावत खासगी तक्रार दाखल करत वकील सुमित महेश बजाज यांच्या वतीने न्यायालयात प्रकरण दाखल केलं.
दरम्यान, सदर प्रकरणी सोमवारी सुनावणी झाली असून यामध्ये न्यायालयाने पीडित पत्नीचे वकील सुमित महेश बजाज, वकील भाग्यश्री किटे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या सहाव्या प्रथम श्रेणी न्यायाधीश व्ही.पी. दुर्वे यांनी पोलिसांना गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अटक करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाने वैद्यकीय क्षेत्रासह सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Leave a Reply