युतीमध्ये तडजोड करावी लागते – संजय राऊत

मुंबई : २२ नोव्हेंबर – हिंदुत्त्व किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर प्रकरणी शिवसेना कधीही तडजोड करणार नाही असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांसंबंधी केलेल्या विधानानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. सावरकरांनी देशाच्या विरोधात जाऊन केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी इंग्रज राज्यकर्त्यांना मदत केली असा आरोप त्यांनी केला होता. यानंतर भाजपाने राहुल गाधींसह काँग्रेसशी हातमिळवणी करणाऱ्या शिवसेनेलाही लक्ष्य केलं होतं. त्यातच आता संजय राऊत यांनी बोलताना पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.
“सावरकर १० वर्ष अंदमान जेलमध्ये होते. ज्यांनी कारावास भोगला आहे, त्यांनाच हा अनुभव काय असतो हे कळू शकतं. सावरकर, नेहरु किंवा नेताजी सुभाषचंद्र बोस असो, पुन्हा मागे जाऊन इतिहासाची मोडतोड करणं योग्य नाही,” असं स्पष्ट मत संजय राऊतांनी मांडलं आहे. यावेळी त्यांनी हिंदुत्त्व आणि सावरकरांच्या मुद्द्यावर काँग्रेसशी नेहमीच मतभेद असतील असंही स्पष्ट केलं.
“आम्ही राहुल गांधींबाबत काही चर्चा करणार नाही. आम्ही त्यांच्याशी सहमत नाही. पण युतीमध्ये तडजोड करावी लागते. युती ही नेहमीच तडजोडीतून केलेली असते,” असं संजय राऊत म्हणाले.
पुढे ते म्हणाले की “युती कायम ठेवण्यासाठी आम्हाला काँग्रेससह राहणं गरजेचं आहे. आम्ही नेहमीच सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याशी चर्चा करत असतो. प्रत्येक मुद्द्यावर आमचं एकमत नसेल, पण हिंदुत्त्व किंवा सावरकरांच्या मुद्द्यावर आम्ही तडजोड करणार नाही”.
राहुल गांधी यांनी सोमवारी संजय राऊत यांना प्रकृतीची चौकशी करण्यासाठी फोन केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी संजय राऊतांनी हे विधान केलं आहे. “भारत जोडो यात्रेत व्यस्त असतानाही राहुल गांधी यांनी मला काल रात्री फोन केला होता. याआधीही त्यांनी माझी चौकशी केलेली आहे. मात्र त्यांनी काल प्रत्यक्ष फोन करून माझ्या प्रकृतीची चौकशी केली. आम्हाला तुमची काळजी होती. तुरुंगातून सुटल्यानंतर तुमची प्रकृती खालावली होती, असे राहुल गांधी मला म्हणाले. त्यांनी माझी प्रेमाने चौकशी केली,” अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
एकीकडे देशासाठी अवघ्या २४ व्या वर्षी बलिदान देणारे बिरसा मुंडा आहेत आणि दुसरीकडे स्वत:ला स्वातंत्र्यवीर म्हणवून घेणारे सावरकर आहेत, ज्यांनी देशाच्या विरोधात जाऊन केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी इंग्रज राज्यकर्त्यांना मदत केली. अंदमान तुरुंगातील शिक्षा कमी करण्यासाठी त्यांनी अनेकवेळा माफीची पत्रे इंग्रज सरकारला लिहिली, अशी टीका खासदार राहुल गांधी यांनी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त मंगळवारी आयोजित कार्यक्रमात केली होती.

Leave a Reply