मनोरुग्णालयात दाखल महिलेने गळफास घेऊन केली आत्महत्या

नागपूर : १८ नोव्हेंबर – अवघ्या दोन दिवसांपूर्वी नागपुरातील प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल झालेल्या मनोरुग्ण महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्या महिलेजवळ आत्महत्या करण्यासाठी साहित्य आले कुठून? असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रतिभा महादेव कोल्हे (वय ३८) असे मृत महिलेचे नाव आहे.
हिंगणघाट तालुक्यातील आजंता हे प्रतिभाचे मुळ गाव. दोन दिवसांपूर्वी तिच्या भावाचे लग्न झाले. ती मनोरुग्ण असल्याने गावात फिरत होती. प्रहारच्या कार्यकर्त्याने सांगितल्यानंतर नागपुरातील सामाजिक कार्यकर्त्याने तिला आईवडिलांसह मेडिकलमध्ये पाठवले. ही घटना मंगळवार १५ नोव्हेंबरची आहे.
रात्री साडेदहाच्या सुमारास मेडिकलमध्ये या महिलेस उपचारासाठी आणले. पण मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याने ती अत्यवस्थ नसल्याचे कारण देत दाखल करून घेतले नाही. प्रतिभाला १६ नोव्हेंबरला दुपारी मनोरुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले. आरटीपीसीआर चाचणी केल्यानंतर मनोरुग्णालयात साडेचारच्या सुमारास दाखल करण्यात आले. यानंतर अवघ्या चार ते पाच तासानंतर प्रतिभाने बुधवारी रात्रीच्या सुमारास आत्महत्या केली. मनोरुग्णालयात दाखल करताना हिरवा गणवेश दिला जातो. आत्महत्या कशी झाली ही माहिती प्रशासनाकडून पुढे आली नाही. मेयो रुग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. बुधवारी रात्रीची घटना असूनही या घटनेबाबत सर्व यंत्रणा चुप्पी साधून आहे.
या मनोरुग्ण महिलेस मेडिकलमध्ये दाखल करण्यासाठी रात्री आणले. मात्र येथे उपस्थित मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याने कोणतीही तपासणी न करता अत्यवस्थ नसल्यामुळे तिला दाखल केले नाही. उद्या सकाळी बाह्यरुग्ण विभागात दाखवा, असे सांगितले. रात्रभर प्रतिभाच्या नातेवाईकांनी मेडिकलच्या आवारात रात्र उघड्यावर काढली.

Leave a Reply