मनसे नेते संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई पोलिसांच्या ताब्यात

बुलढाणा : १८ नोव्हेंबर – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात विधान केल्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात मनसे आक्रमक झाली आहे. राहुल गांधी यांचा निषेध म्हणून त्यांची पदयात्रा रोखण्यासाठी मनसे सैनिक बुलढाण्याच्या दिशेने निघाले. पण त्यांना पोलिसांनी मध्येच अडवले आहे. पोलिसांनी मनसे नेते संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई यांना ताब्यात घेतलं. तसेच इतर मनसैनिकांची धरपकड केली. त्यामुळे मनसैनिकांनी जोरदार निदर्शने केल्यामुळे या परिसरातील वातावरण तापलं आहे.
राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर भाजपबरोबर मनसे नेत्यांनीही टीका केली आहे. आपला निषेध व्यक्त करण्यासाठी आज सकाळीच मनसे कार्यकर्ते काही नेत्यांसह राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या दिशेने निघाले होते. दरम्यान बुलढाण्यातील चिखोली भागात मनसे नेते आणि कार्यकर्त्यांनी पोलिसांनी अडवलं होतं. यानंतर मनसैनिकांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केलं. दरम्यान काही वेळानंतर सर्व नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबतीत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता भाजप आक्रमक झाली आहे. पुण्यात भाजप कार्यकर्त्यांकडून काँग्रेस कार्यालायवर निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी काही कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत राहुल गांधी मुर्दाबादच्या घोषणा दिल्या तसेच पंडित जवाहरलाल नेहरुंनी सावरकरांची माफी मागितल्याचे पोस्टर लावण्यात आले. दरम्यान याबाबत पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत भाजप कार्यकर्त्यांची धरपकड केली. यावेळी काही काळ वातावरण तणावाचे बनले होते.

Leave a Reply