गुजरातमध्ये एटीएसच्या १३ जिल्ह्यांमध्ये १०० हुन अधिक ठिकाणी छापेमारी

अहमदाबाद : १२ नोव्हेंबर – गुजरात विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं असून 1 आणि 5 डिसेंबर अशा दोन टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. अशातच गुजरातमध्ये दहशतवाद विरोधी पथकानं कारवायांचा सपाटा सुरु केला आहे. एटीएसनं गुजरातमधील 13 जिल्ह्यांमधील 100 हून अधिक ठिकाणी छापेमारी केली आहे. तसेच, तब्बल 65 जणांना अटक केली आहे. काल (11 नोव्हेंबर) रात्रीपासून छापेमारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
देशविरोधी कारवाया रोखण्यासाठी गुजरात एटीएसनं मोठी कारवाई केली आहे. गुजरात एटीएसनं 11-12 नोव्हेंबरच्या रात्री राज्यातील 13 जिल्ह्यांतील 100 ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत गुजरात एटीएसनं 65 जणांना अटकही केली आहे. अहमदाबाद, भरूच, सुरत, भावनगर आणि जामनगर येथे छापे टाकण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. बनावट बिलांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची हेराफेरी केल्याप्रकरणी एजन्सीनं ही छापेमारी केली आहे.
मिठाई, रिअल इस्टेट आणि फायनान्सशी संबंधित अनेक गटांवर आयकर विभागानं कारवाई केली आहे. या छापेमारीमुळे रिअल इस्टेट व्यवसायात खळबळ उडाली आहे. यासोबतच फायनान्स ब्रोकर्समध्येही भीतीचं वातावरण आहे. एटीएसनं केलेल्या छापेमारीत मोठी बेनामी मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुजरात एटीएस, जीएसटी विभागासोबत संयुक्त कारवाई केली आहे. आतापर्यंत सूरत, अहमदाबाद, जामनगर, भरूच आणि भावनगर या जिल्ह्यांमध्ये 150 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. करचोरी आणि पैशांच्या व्यवहारासाठी आंतरराष्ट्रीय मार्गांवर हे छापे टाकण्यात येत आहेत.

Leave a Reply