वर्धेतील शेतकऱ्याने रेशीम शेतीचा पर्याय निवडत मिळवले लाखोंचे उत्पन्न

वर्धा : १२ नोव्हेंबर – पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड देत शेतकरी आता शाश्वत आणि जास्त उत्पादन देणाऱ्या तुतीची शेती करत आहेत. शेतकरी रेशीम शेतीतून आधुनिक क्रांती घडवत आहेत. वर्धा जिल्ह्यातील शेतकरी अविनाश वाट यांनी देखील पारंपारिक शेतीला फाटा देत रेशीम शेतीचा पर्याय निवडला आहे. आता या शेतीतून लाखोंचे उत्पन्न मिळत आहे.
वर्धा तालुक्यातील पवनार हे गाव आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. याच गावातील शेतकऱ्याने कमी पाणी आणि कमी खर्चात रेशीम शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवले आहे. पंचक्रोशीतील शेतकरी येथील रेशीम शेती पाहण्यासाठी येत आहेत.अविनाश वाट यांचा रेशीम शेतीतील यशस्वी प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
वर्धा शहरालगत असलेले पवनार हे गाव. येथील शेतकरी पिढ्यानपिढ्या पारंपरिक शेती करतात. मात्र, या शेतीतून हवा तेवढा नफा मिळत नाही. भाजीपाला, सोयाबीन, कापूस, तूर अशा पिकांतून शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळत नाही. त्यात नैसर्गिक संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. याला पर्याय म्हणून कमी पाण्याची व कमी खर्चाच्या शेतीसाठी येथील काही शेतकऱ्यांनी रेशीम शेतीचा वेगळा पर्याय शोधला आहे.
पवनार येथील शेतकरी अविनाश रवींद्र वाट यांनी आपल्या शेतात रेशीम शेतीचा नवीन प्रयोग केला आहे. त्यांना मिळालेले यश पाहून इतरही काही शेतकऱ्यांनी रेशीम शेती करण्यास सुरुवात केली आहे. मागील काही वर्षांत जिल्ह्यात रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या हळूहळू वाढत आहे. त्यामुळे या शेतीबाबत कृषी विभागानेही गावपातळीवर प्रभावी जनजागृती करण्याची गरज कृषी तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
अविनाश वाट यांनी प्रथम अडीच एकरावर हा प्रयोग तसेच व्यवसाय सुरू केला. कोरोना काळातील नुकसानीनंतरही त्यांनी यात हार न मानता व्यवसायाला वृद्धिगंत करण्याचा निश्चय केला. वाट पवनार येथील स्थानिक व्यापाऱ्यांना कोष विक्री करतात. त्यांनी आता दिवाळीत 200 अडी पुजास 190 किलो ग्रॅम कोष उत्पादन घेतले. 580 दराप्रमाणे तब्बल 1 लाख 10 हजार 200 रुपये एवढी एका महिन्याला रक्कम मिळाली आहे. शेतकरी वाट यांना रेशीम शेतीतून एकरी वर्षाला 3 ते 4 लाख उत्पादन मिळत आहे.
रेशीम उद्योगातून महिन्याकाठी भरघोस उत्पन्न घेणारे शेतकरी अविनाश वाट हे इतर शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीकडे न वळता रेशीम शेती करावी असे आवाहन करतात. तसेच शेतकऱ्यांसाठी रेशीम उद्योगासाठी शासनाच्या विविध योजना आहेत त्याचा उपयोग करून सामान्य शेतकरी पण आपल्या शेतात रेशीम शेती व उद्योग करू शकतो. त्यातून लाखोंचे उत्पन्न शेतकरी घेऊ शकतात.
मनरेगा अंतर्गत तुती लागवड अनुदान, कीटक संगोपन, गृह बांधकामासाठी अनुदान योजना या सोबतच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत तुती लागवड अनुदान अशा योजनेचा शेतकरी फायदा घेऊ शकतात. शासनाच्या योजनेबद्दल जिल्हा रेशीम कार्यालय वर्धा संपर्क 9423422226 क्रमांक येथे देखील संपर्क साधता येतो, अशी माहिती रेशीम विकास अधिकारी आदेश वाघ यांनी दिली.

Leave a Reply