जितेंद्र आव्हाडांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

ठाणे : १२ नोव्हेंबर – ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा शो बंद पाडून एका प्रेक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहनिर्माणमंत्री आमदार जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह ११ जणांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. आज सकाळी वर्तकनगर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड आणि ११ कार्यकर्त्यांना ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या हॉलिडे कोर्टामध्ये हजर केले होते.
जितेंद्र आव्हाड यांच्यावर अजूनही टांगती तलवार आहे. न्यायालयात आव्हाडांचे वकील आणि सरकारी वकील यांच्यात जोरदार युक्तिवाद झाला. पोलिसांकडून आव्हाडांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. ठाणे न्यायालयाने संपूर्ण युक्तिवाद ऐकल्यानंतर दुपारी २ वाजेच्या सुमारास या प्रकरणी निर्णय दिला. न्यायालयाने जितेंद्र आव्हाड यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आता आव्हाड यांच्या वकिलांकडून त्यांना जामीन मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणी वकिलांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला असून त्यावर ३ वाजता सुनावणी होईल. यावर ४ वाजेनंतर निकाल येण्याची शक्यता आहे.
आव्हाड यांच्या अटकेनंतर त्यांचे समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने न्यायालयाच्या परिसरात गर्दी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आव्हाड यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विशेष म्हणजे यामध्ये महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येत होत्या. दरम्यान, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात केला होता. तसेच पोलिसांकडून कोर्टाच्या दिशेने येणारे तिन्ही रस्ते बंद करण्यात आले होते.
आव्हाड यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक होत वर्तकनगर पोलिस ठाण्याच्या बाहेर मोठ्या संख्येने जमा झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देत ठिया आंदोलन केले. त्यामुळे याठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण होते. तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांनी मुंब्रा बायपास रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले.
ठाण्यातील विवियाना मॉलमधील सिनेपोलिस चित्रपटगृहामध्ये सोमवारी रात्री ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो सुरू होता. शो सुरू असताना, अचानक जितेंद्र आव्हाड कार्यकर्त्यांसोबत चित्रपटगृहामध्ये धडकले. या चित्रपटामध्ये चुकीचा इतिहास दाखवला जात असल्याचा आरोप करत त्यांनी चित्रपटाचा शो बंद पाडला. तसेच चित्रपटगृहातून प्रेक्षकांना निघून जाण्याविषयी सांगितले. चित्रपटाचा शो बंद झाल्याने प्रेक्षक चित्रपटगृहातील स्क्रीनजवळ जमले. त्यावेळी कोणीतरी चित्रपट बंद पाडत आहात तर आमचे पैसे परत देण्याची मागणी केली. तसेच कोणीही येईल आणि चित्रपट बंद पाडेल, असेही प्रेक्षकांपैकी कोणीतरी बोलले. याचा राग कार्यकर्त्यांना आला. आणि जमावातील काही जणांनी ठोशाबुक्यांनी मारहाणी केल्याची तक्रार चित्रपट पाहण्यासाठी आलेले ठाण्यातील व्यावसायिक परीक्षित दुर्वे यांना केली होती. चित्रपटाचा शो बंद पाडल्याचे समजल्यानंतर त्याठिकाणी मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आले. आणि त्यांनी हा शो पुन्हा सुरू करण्यास भाग पाडले.
चित्रपटाचा शो बंद पाडणे, तसेच मारहाण केल्याप्रकरणी दुर्वे यांनी केलेल्या तक्रारीनंतर आव्हाड यांच्यासह १०० कार्यकर्त्यांविरुद्ध वर्तकनगर पोलिस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी शुक्रवारी दुपारी नोटीस देण्यासाठी तसेच जबाब नोंदवण्यासाठी आव्हाड यांना वर्तकनगर पोलिस ठाण्यात बोलवले. त्यानंतर दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी आव्हाड, आनंद परांजपे यांच्यासह ११ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. आव्हाड यांना अटक झाल्याचे समजताच वर्तकनगर पोलिस ठाण्याच्या बाहेर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या दिला. जोरदार घोषणा देण्यात येत असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता. पोलिस ठाण्यात कार्यकर्ते घुसू नये यासाठी पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वाराजवळच बॅरिकेट लावण्यात आले होते. आव्हाड यांच्या अटकेमुळे आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी मुंब्रा बायपास रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी १५ ते २० कार्यकर्त्यांना ताब्यात घेत पुन्हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.
जितेंद्र आव्हाड यांच्यासह ११ जणांना सायंकाळी ठाणे न्यायालयात आणले जाण्याच्या शक्यतेमुळे ठाणे न्यायालयाच्या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. पोलिस अधिकारी तसेच कर्मचारी तैनात करण्यात आले होते. त्यामुळे आव्हाड यांना शुक्रवारची रात्र पोलिस ठाण्यातच काढावी लागली. दरम्यान, रात्री आव्हाड यांना पोलीस बंदोबस्तामध्ये ठाणे सिव्हिल रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते.

Leave a Reply