सचिन वाझेचे यांचे कारागृहातील सुरक्षारक्षकांसोबत असभ्य वर्तन

मुंबई : ६ नोव्हेंबर – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याबाहेर सापडलेल्या स्फोटके प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझेचे नवे नाटक उघडकीस आले आहे. वाझे सध्या नवी मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहात कैद आहे. त्याने कारागृहातील सुरक्षारक्षकांसोबत असभ्य वर्तन केले, त्यांना धमकीही दिली, असा आरोप करीत तळोजा तुरुंग प्रशासनाने वाझेविरोधात मुंबईतील सत्र न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमुळे वाझे हा न्यायालयाच्या तडाख्यात सापडला.
तुरुंग प्रशासनाच्या तक्रारीमुळे आपल्या अडचणींमध्ये मोठी वाढ होऊ शकते हे लक्षात येताच वाझेने सत्र न्यायालयात माफी मागितली. तुरुंगातील धिंगाण्यामुळे तो पुन्हा एकदा वादात सापडला आहे.
रुग्णालयात नेण्यासाठी आकांडतांडव
सचिन वाझे हा सुरुवातीपासूनच जेलमधील त्याच्या वागण्यावरून चर्चेचा विषय राहिला आहे. त्याने नुकतेच सत्र न्यायालयात आपल्या डोळ्यांच्या त्रासाबद्दल म्हणणे मांडले आहे.
दोन्ही डोळ्यांमध्ये ग्लुकोमा झाला असल्याने मला रुग्णालयात दाखल होण्यासाठी परवानगी द्या, अशी विनंती त्याने सत्र न्यायालयाला केली आहे. न्यायालयाने त्याच्या या विनंतीची दखल घेताना आज तळोजा तुरुंग प्रशासनाला अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
याच दरम्यान वाझेने रुग्णालयात नेण्यासाठी तळोजा तुरुंगातील सुरक्षारक्षकांबरोबर हुज्जत घातल्याचे उघडकीस आले आहे. त्याने सुरक्षारक्षकांना असभ्य भाषेत धमकावल्याचेही तुरुंग प्रशासनाने तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीनंतर वाझेने न्यायालयात माफी मागितल्याचे समजते.
पुढील सुनावणी 10 नोव्हेंबरला
सचिन वाझे हा ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरे हत्या प्रकरणात देखील आरोपी आहे. त्याने गेल्या आठवड्यात रुग्णालयात नेण्यासाठी जेल अधीक्षकांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. त्यादरम्यान त्याने सुरक्षारक्षकांसोबत असभ्य वर्तन केल्याचे बोलले जात आहे.
सुरक्षा रक्षकाने अडवताच त्याने जोरजोरात ओरडत धमकी दिली. याबाबत तळोजा तुरुंग प्रशासनाने सत्र न्यायालयातील एनआयच्या विशेष कोर्टात तक्रार दाखल केली आहे. सत्र न्यायाधीशांनी तुरुंग प्रशासनाच्या तक्रारीची दखल घेत सचिन वाझेच्या वकिलांना उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
याप्रकरणी पुढील आठवड्यात 10 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. त्यावेळी वाजेच्या वकिलांना लेखी उत्तर सादर करावे लागणार आहे.

Leave a Reply