चंद्रपूर व गडचिरोलीत वाघाच्या हल्ल्यात २ ठार

नागपूर : ४ नोव्हेंबर – शेतात काम करीत असलेल्या महिलेवर हल्ला करून तिला ठार केल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात घडली. तर शेतानजीकच्या जंगलात बैल चारत असताना टी-६ वाघिणीने हल्ला करून एका शेतकऱ्यास ठार केले. ही घटना गडचिरोली जिल्ह्यात घडली. एकाच दिवशी घडलेल्या या दोन घटनांमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) मध्ये जाईबाई तोंडरे या धानपीक काढण्यासाठी शेतात गेल्या होत्या. शेतात लपून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. वाघाने त्यांचे शरीर धडापासून वेगळे केले. या जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष तीव्र झाला आहे. वाघांची नसबंदी करा किंवा स्थानांतरण करा, अशीही मागणी होत आहे. घटनेची माहिती मिळताच ब्रह्मपुरी वनविभागातील उत्तर वनपरिक्षेत्राधिकारी महेश गायकवाड, क्षेत्र सहाय्यक मिलिंद सेमस्कर, वनरक्षक कागणे व पोलिस व वनविभागाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल झाले. मृताच्या कुटुंबीयांना अंत्यसंस्कारासाठी तातडीने मदत करण्यात आली.
गडचिरोली जिल्ह्यात शेतानजीकच्या जंगलात बैल चारत असताना टी- ६ वाघिणीने हल्ला करून एका शेतकऱ्यास ठार केले. ही घटना दुपारी दोन वाजताच्या सुमारास गडचिरोलीपासून ८ किलोमीटर अंतरावरील राजगाटा चेक गावानजीक घडली.

Leave a Reply