खगोलप्रेमींना ८ नोव्हेंबरला खंडग्रास चंद्रग्रहण पाहण्याची संधी

नागपूर : ३ नोव्हेंबर – ऑक्टोबर महिन्यात खंडग्रास सूर्यग्रहण पाहिल्यानंतर खगोलप्रेमींना आठ नोव्हेंबरला खंडग्रास चंद्रग्रहण पाहण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात सायंकाळी साडेपाच वाजता तर मुंबईत ६ वाजून एक मिनीटांनी चंद्रग्रहणाला सुरुवात होणार आहे. ७ वाजून २६ वाजता ग्रहण संपणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात ७० टक्के तर पश्चिम प्रदेशात १५ टक्के ग्रहण दिसणार आहे अशी माहिती खगोल अभ्यासक आणि स्काय वाच ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली. देशात पूर्वोत्तर भागात सर्वाधिक ९८ टक्के आणि ३ तास ग्रहण पहावयास मिळेल. तर पश्चिम भारतातून केवळ १ तास १५ मिनिटे खंडग्रास चंद्रग्रहण दिसेल
आठ नोव्हेंबर २०२२ ला दिसणारे खग्रास चंद्रग्रहण आशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तर-दक्षिण अमेरिका, येथील काही भागातून दिसेल. पूर्वोत्तर भारताचे टोक असलेल्या अरुणाचल प्रदेशात चंद्र उगवताना खग्रास स्थिती असेल. परंतु, चंद्र क्षितिजावर असल्याने पाहता येणार नाही. उर्वरित देशात सर्वत्र हे ग्रहण खंडग्रास दिसेल. आठ तारखेला भारतीय वेळेनुसार दुपारी १ वाजून ३२ मिनीटांनी छायाकल्प चंद्रग्रहणाला सुरवात होईल. २ वाजून ३९ वा खंडग्रास ग्रहणाला सुरवात होईल. ३ वाजून ४६ वा खग्रास ग्रहणाला सुरवात होणार आहे. ५ वाजून ११ मिनिटांनी खग्रास ग्रहण समाप्त होईल. ७ वाजून २६ मिनिटांनी छायाकल्प चंद्रग्रहण समाप्त होईल.

Leave a Reply