राज्य सरकारच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना दिवाळीआधी मिळणार वेतन

मुंबई : १८ ऑक्टोबर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या सेवेतील अधिकारी, कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांना दिवाळी गिफ्ट दिलं आहे. यंदाची दिवाळी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस येणार असल्यानं कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोबरच्या वेतनाबाबत सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचा शासन निर्णय राज्य सरकारकडून प्रसिद्ध झाला आहे. राज्य सरकारच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी म्हणजेच २१ ऑक्टोबरपर्यंत वेतन अदा करण्याचे आदेश देणारा शासन निर्णय जारी झाला आहे.

दिवाळी सणाची सुरुवात यावर्षी २२ ऑक्टोबर, २०२२ पासून होत आहे. राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारक यांना दिवाळी सण साजरा करताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये या उद्देशाने ऑक्टोबर २०२२ चे माहे नोव्हेंबर २०२२ मध्ये देय होणारे वेतन / निवृत्तीवेतन दिवाळी सणापूर्वी देण्याचा सरकारचा विचार होता. राज्य सरकारनं वेतन अदा करण्यासंदर्भातील नियम शिथील करुन ऑक्टोबर २०२२ या महिन्याचे वेतन आणि निवृत्तीवेतन २१ ऑक्टोबर २०२२ रोजी अदा करण्याचा निर्णय घेतला.
जिल्हा परिषद, मान्यताप्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठे / अकृषी विद्यापीठे व त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालयांचे अधिकारी / कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक यांना देखील याचा लाभ होणार आहे. यासंबधीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देखील संबधित यंत्रणा आणि विभागांना देण्यात आले आहेत.
दिवाळीपूर्वीच ऑक्टोबर महिन्याचं वेतन जमा करण्याचा निर्णय घेत राज्य सरकारनं कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे.

Leave a Reply