कुणाच्याही कोंबड्यांनी दिवस उगवला तरी माझी हरकत नाही – शरद पवार

मुंबई : १७ ऑक्टोबर – अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी अखेर उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आल्यानंतर भाजपच्या या निर्णयाचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आभार मानले आहेत. राज ठाकरे यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही भाजपच्या निर्णयाचे स्वागत केलं आहे. कुणाच्याही कोंबड्यांनी दिवस उगवला तरी माझी हरकत नाही, असं सूचक विधानही शरद पवार यांनी यावेळी केलं आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, अशी माझी मागणी नव्हती. मी मागणी कशी करणार? मी फक्त भाजपला तसं सूचवलं होतं. सूचवल्यानंतर त्यातून सकारात्मक निर्णय घेतला जाईल याची मला खात्री होती. तो सकारात्मक निर्णय झाला. एकदा निर्णय झाल्यानंतर त्याच्या खोलात मी जात नाही. त्यामुळे आता त्यावर अधिक चर्चा करण्यात अर्थ नाही, असं शरद पवार म्हणाले.
भाजपने उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. पण त्याचं श्रेय ते राज ठाकरे यांना देत आहेत. त्याबाबत पवारांना विचारलं असता पवारांनी मिश्किल टिप्पणी केली. कुणाच्याही कोंबड्यांनी दिवस उगवला तरी माझी हरकत नाही, असं पवार म्हणाले.
एकदा उमदेवाराने माघार घेतल्यानंतर त्यात शंका कारणं काढण्याची गरज नाही. कारण मिमांसा करण्याची गरज नाही. पोटनिवडणूक होती. दिवंगत रमेश लटकेंच्या पत्नीला वर्ष, सव्वा वर्ष मिळणार होतं. त्याबाबत भाजपने निर्णय घेतला हे चांगलं झालं. माझ्या दृष्टीने निर्णय काय झाला हे महत्त्वाचं आहे. तो कधी झाला? का झाला? हे महत्त्वाचं नाही. असे निर्णय पटकन होत नसतात. त्यासाठी ग्राऊंडवर्क करावं लागतं, असंही त्यांनी सांगितलं.
उद्धव ठाकरे यांचं स्टेटमेंट आलं आहे. त्यांनी निर्णयाचं स्वागत केलं आहे. खरे तर उमेदवारी अर्ज मागे घ्या हे त्यांनी सांगायची गरज नाही. जेव्हा एकच वर्षाचा कालावधी मिळत असेल. अन् त्या कुटुंबाचा सदस्य लढत असेल तर माघार घेतली पाहिजे, असं ते म्हणाले.
आता निवडणुकीत जे उभे आहेत त्या इतर लोकांनीही माघार घेतली तर बरं होईल. त्यांनी माघार घेतली तर निवडणूक होणार नाही. ज्यांनी अर्ज भरला त्यांना आम्ही ओळखत नाही. त्यामुळे त्यांना आम्ही आवाहन करणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Leave a Reply